कोरोनाविरूद्ध जिल्हाभरात आजपासून ‘विकेंड लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:54+5:302021-04-10T04:27:54+5:30
‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची ...

कोरोनाविरूद्ध जिल्हाभरात आजपासून ‘विकेंड लॉकडाऊन’
‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस चिंतेत भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम स्वीकारली. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. अंमलबजावणीसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
असा असेल ‘विकेंड लॉकडाऊन’
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणे वा जमा होण्यास प्रतिबंध आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजतापर्यंत विनाकारण फिरण्यास मनाई आहे.
आजपासून ऑटो रिक्षांवर निर्बंध
ऑटो रिक्षामध्ये चालक अधिक २ प्रवासी, टॅक्सी चारचाकी वाहन - चालक वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के किंवा आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतकेच प्रवासी नेण्यास परवानगी आहे. लसीकरण पूर्ण होईपर्यंत १५ दिवसांसाठी वैध असलेले कोरोना चाचणी प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवावे लागणार असल्याने ऑटोचालक अडचणीत येणार आहेत.
खासगी वाहतूक रात्री आठपर्यंतच
खासगी वाहने व बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा व निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी परवानगी आहे. या चालकांनाही लसीकरण किंवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
दोन दिवस फक्त घरपोच पार्सल सेवा
हॉटेलच्या आवारातील रेस्टॉरंटवगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील. शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. सेवा देणाऱ्या कामगारांनी लसीकरण व निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर एक हजार दंड व आस्थापनेवर १० हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ऑक्सिजन ग्राहकांसाठी नवी अट
सर्व औद्योगिक आस्थापनांना आजपासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. प्राधिकाऱ्याकडून पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सर्व ऑक्सिजन उत्पादकांना उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.
काय बंद काय सुरू राहणार?
रुग्णालये, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, औषध दुकाने, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टॅक्सी, ऑटो रिक्षा, माल वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, वृत्तपत्र आदी आवश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
बंदोबस्तासाठी २१०० पोलीस तैनात
जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १६० अधिकारी, दोन हजार १०० पोलीस आणि ३५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.