विद्यार्थ्यांनी दाखविला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:57 IST2018-10-06T22:56:39+5:302018-10-06T22:57:05+5:30
शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी वाचवा, वन्यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करीत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच; त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे.

विद्यार्थ्यांनी दाखविला मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी वाचवा, वन्यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करीत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच; त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे. त्या माध्यमातुन वनविभाग निश्चितच योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शनिवारी चंद्रपूर तालुक्यातील मोहर्ली येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात तसेच इलेक्ट्रिक बॅटरी वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘देव बोलतो बालमुखातून, देव बोलतो उंच पिकातून’ अशी म्हण आपल्याकडे रूढ आहे. ही बालवाणी म्हणजे देववाणी आहे. यातून पाण्याचे महत्त्व, वन्यजीवांचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांनी नेमक्या पध्दतीने विषद केले आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वन्यजीव विशेष महत्त्वाचे आहे. वाघ पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच शेकडो लोकांना रोजगारही देतो. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्व. उत्तमराव पाटील वनउद्यान, इको पार्क, आॅक्सीजन पार्क आपण तयार करतो आहोत. बांबु मिशनच्या माध्यमातून बांबु धोरणाला आपण चालना दिली आहे. राष्ट्रपती भवनातसुध्दा बांबु लागवडीसाठी महाराष्ट्राच्या वनविभागाला आमंत्रित करण्यात आले आहे. वनविभागाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी परिश्रम घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांचासुध्दा सिंहाचा वाटा असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना वनमंत्र्यांच्या हस्ते पारितोषीके वितरित करण्यात आली. वनविभागातील तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा सत्कारदेखील यावेळी करण्यात आला. यावेळी इलेक्ट्रीक बॅटरी वाहनाचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. प्रवीण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, मनपा सदस्य रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उत्तम आरोग्य सेवा देणार
मूल : विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावणार नाही, यासाठी उत्तम आरोग्यसेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे. यासोबतच प्रत्येक घरात गॅस वाटप, ग्रामीण भागातील प्रवाशांना उन्ह, वारा, पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी पिकअॅप बसशेड उभारून बल्लारपूर विधानसभा क्षेत्र देशात सर्वांगसुंदर विधानसभा क्षेत्र तयार करू, असा ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते माजी खासदार अनु आगा यांच्या खासदार निधी व खनिकर्म विकास निधीमधून मूल तालुक्यातील चिरोली येथील अंधारी नदीवर बंधारा बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगडे, जिल्हाचे पालक सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापडकर, मूल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे उपस्थित होते.