पाण्याअभावी सोयाबीन करपण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: October 3, 2014 01:20 IST2014-10-03T01:20:44+5:302014-10-03T01:20:44+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा....

पाण्याअभावी सोयाबीन करपण्याच्या मार्गावर
सास्ती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा परिसरातील गावात जवळपास १ हजार १०० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु हा पुरवठा मागील काही दिवसापासून अनियमित व अपुऱ्या दाबाचा होत असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. सिंचनाअभावी शेतातील उभे पिक करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर, विहीरगाव, नलफडी, मुर्ती, सिंधी, कोहपरा, धानोरा, कविठपेठ, चनाखा, पंचाळा, सातरी, नवी सातरी, चुनाळा या गावातील जवळपास १ हजार १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा देण्यात आला आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे विजेचा अभाव असून कनेक्शन धारकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंपेसुद्धा चालन नसून सिंचनाची सोय उपलब्ध असूनही अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे मात्र शेती सिंचनापासून वंचित आहे. सध्याच्या काळात शेतातील पिके भरणीवर आली असून पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सिंचनाअभावी उत्पादन क्षमतेतही मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मोठ्या प्रमाणात कृषी पंप धारकांची संख्या असल्यामुळे वीज पुरवठा अपुरा पडतो. पंप सुरू होताच अनेकदा उच्च दाबामुळे लाईन ट्रिप होते. त्यामुळे वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होतो.या भागात मोठ्या प्रमाणात विद्युत भारनियमन असल्यामुळे दिवसाच्या २४ तासातील फक्त २-३ तासच वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करीत शेती करावी लागत असून आता नविनच संकटाला समोर जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)