दंडार नाट्य लुप्त होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: November 14, 2015 01:14 IST2015-11-14T01:14:35+5:302015-11-14T01:14:35+5:30
दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे.

दंडार नाट्य लुप्त होण्याच्या मार्गावर
लोककला जपण्याची गरज : तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक ठेवा नष्ट
नवरगाव : दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे. दंडार ही लोककलेचा भाग असून १५ वर्षापूूर्वी ग्रामीण भागात दंडारीचे सादरीकरण सणासुदीच्या वेळेत गावागावात होत असे. मात्र आज ही लोककला एखाद्यावेळेस पाहावयास मिळते. हळूहळू ती लोप पावत आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने रत्नापूर हेटी (इंदिरानगर) येथील श्री बाल दंडार मंडळाने ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या दंडारीचे सादरीकरण करुन लुप्त होत चाललेल्या दंडारीची रसिकांना दिवाळी भेट दिली.
दंडारीत स्त्री पात्राचे काम पुरुषाला करावे लागते. दंडार ढोकली, तुनतुने, टाळ यासारख्या वाद्यांच्या निनादात सादर केली जाते. पात्रांच्या बोलण्याच्या वाक्यापेक्षा गाण्यांचीच भर मोठ्या प्रमाणात असते. एक- दोन महिने तालीम करुन दंडारीचे सादरीकरण केले जाते. पंधरा- वीस वर्षांपूर्वी दंडार मंडळे अस्तित्वात होती. सणासुदीला दंडारीचे प्रयोग विरंगुळा म्हणून सादर केले जायचे. मात्र काळानुरुप मनोरंजनाच्या कार्यक्रमात तंत्रज्ञानाची वेगळीच भर पडल्यामुळे दंडारीचे प्रयोग कमी झाले. आजच्या युगात टीव्ही, चित्रपट यासारख्या विविध माध्यमांची भर पडत गेल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यामुळे दंडार काळानुरुप काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
दंडार म्हटले की, रात्री ८ ते ९ वाजता सुरु झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालत असे. या दंडारीला मुख्यत्वे करुन महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित होता. दंडारीच्या माध्यमातून रामायण, महाभारत, राजा- राणीच्या विषयावरील ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केल्या जायचे. यासोबतच संगीत नाटकाचे सादरीकरणही ग्रामीण भागात होत होते.आज संगीत नाटकही काळानुरुप लोप पावत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दंडारीला मनोरंजनाचे साधन समजले जात असले तरी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. परंतु ही लोककला आज लोप पावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या दिवशी रत्नापूर हेटी (इंदिरानगर) यथील श्री बाल दंडार मंडळातील युवकांनी ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या सामाजिक विषयावरील दंडारीचे सादरीकरण करुन संस्कृतीचा ठेवा जपल्याचे दिसून आले. (वार्ताहर)