Watermelon ripened in the river basin on the farm dam | नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

नदीपात्रातील टरबूज पिकविले शेतीच्या बांधावर

ठळक मुद्देआठ एकरात नऊ लाखांचे उत्पादन, बेरोजगारीवर मात करून फुलविली टरबूज शेती

अमोद गौरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : वडिलांनी शेती पिकवून मुलाला उच्चशिक्षित केले. नोकरी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही स्वप्न पूर्ण झाले नाही. अखेर मुलांनीच वडीलाच्या मार्गदर्शनाखाली एकेकाळी नदीच्या पात्रात पिकणारी टरबूज शेती थेट शेतीच्या बांधावर पिकवून उन्नतीचा मार्ग स्वीकारला आहे.
साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प्रयोग कोणते, करायचे या विचारात असतानाच मुलगा रोशन पांगुळ यांची कृषितज्ज्ञ हर्षल माने यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने टरबूज शेती करण्याचा सल्ला दिला. नदीपात्रात पिकणारे टरबूज शेतीच्या बंधावर कसे पिकवायचे याची माहिती दिली. त्यामुळे रब्बी हंगामात टरबूज शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्या आठ एकर शेतात लागवड केली.
हर्षल माने यांच्यासोबतच शंकरपूचे मंडळ अधिकारी आर. के. निखारे, कृषी सहाय्यक पी. टी. भगत, पी. वाय. नंद, वाय. डब्लू रघुते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यात आठ एकरमध्ये नऊ लाखांचे पीक घेतले. यांच्या सोबतच बाळू पांगुळ यांनीही टरबूज लागवड करून भरघास पीक घेतले. नदी पात्रात टरबूज शेती केल्याने पाणी कमी लागते. मात्र, शेतीत याचा खर्च वाढण्याचा धोका असतो. अशावेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टरबूजसाठी पोषक ठरले. मनात इच्छा असली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळत असते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने व नवनवीन पिके घेऊन शेती करावी, असे आवाहन रोशन पांगुळ यांनी केले.

लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटले
नदीपात्राऐवजी शेतात टरबूज लागवड केल्याने यासाठी चार लाखांचा खर्च आला. खर्च वजा करून पाच लाखांचा नफा झाला. हा नफा पुन्हा वाढला असता. परंतु, लॉकडाऊनमुळे मोठी बाजारपेठ मिळाली नाही, अशी माहिती रोशन पांगुळ यांनी दिली.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती टाळावी
चिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. अनेक शेतकºयांचा शेती करण्याचा दृष्टिकोन पारंपरिक असल्याने दरवर्षी मोठे नुकसान होते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न होत नाही. त्यामुळे केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी नवीन नगदी पिके घ्यावी, असा सल्ला रोशन पांगुळ यांनी दिला आहे.

Web Title: Watermelon ripened in the river basin on the farm dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.