देवाडा गावात पाणी टंचाई
By Admin | Updated: May 17, 2015 01:27 IST2015-05-17T01:27:49+5:302015-05-17T01:27:49+5:30
तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली.

देवाडा गावात पाणी टंचाई
नागरिकांचे हाल : ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीची घाई
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र आजमितीला सहा वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा सदर टाकीत पाणीच साठविण्यात न आल्याने ही टाकी स्वत:च पाण्यासाठी व्याकूळ झाली असल्याचे भीषण वास्तव येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. ेदुसरीकडे मात्र ग्रामपंचायत सदस्य गावात पाणी टंचाई असताना निवडणुकीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे मागील १५ वर्षांपासून ७२ हजार लिटर क्षमतेची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीमुळे नळजोडणीधारकांच्या संख्येतही भर पडत आहे. सदर योजनेच्या पाईप लाईनचे काम अत्यंत सदोष पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजमधून पाणी वाया जात आहे. परिणामी गावातील नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी या नेहमीच्या पाणी टंचाईला कंटाळून लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती केली. यावर देखरेखीसाठी पाणी पुरवठा समितीची स्थापनासुद्धा करण्यात आली. एका कंत्राटदाराकडे सदर योजनेचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र या कामावर पाणी पुरवठा समिती तसेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे सदर योजनेला सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनसुद्धा ही योजना तहानलेलीच आहे. याठिकाणी पाण्याच्या भूगर्भाची पातळी अतिशय खोल गेल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्येच विहिरी कोरडे होतात, तर हॅन्डपंपाना फार अल्प प्रमाणात पाणी असते. गावात अनेक वर्षांपासून ही स्थिती भेडसावत आहे. एप्रिल-मे महिन्यांमध्ये तर येथील नागरिक बैलबंडीद्वारे शेतातील विहिरीचे व तलावाचे पाणी आणताना दिसतात. एवढी गंभीर समस्या याठिकाणी उद्भवत असताना येथील ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र स्थानिक नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याऐवजी आॅगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची व्यूहरचना आखत असून कोणत्या वार्डात कोणते उमेदवार उभे करायचे, याचा शोध घेण्यात व्यस्त झाले आहेत.
यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाहिजे, त्या प्रमाणात तलावामध्ये शिल्लक पाणी उरले नाही. आणि अंधारी नदीचे पात्र सुद्धा कोरडे होत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी येणार नाही. मग पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. पुढे जनावरांना पाणी मिळणेसुद्धा दुरापास्थ होणार असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मात्र पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व अभियंते याबाबत उदासिन असून त्यांचेसुद्धा यावर नियंत्रण नसल्याने गावात पाण्याचे दोन टाकी असूनसुद्धा गावातील नागरिक तहानलेलेच आहे.
पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांना आतापर्यंत या योजनेवर किती खर्च झाला, याबाबत विचारणा केली असता त्यांनी किती खर्च झाला, किती रक्कम उचल करण्यात आली, याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सभा सुद्धा घेण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे. यावरुन सदर प्रकरणात फार मोठे गौडबंगाल झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठांमार्फत चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघकीस येणार असल्याचे समजते. त्यामुळे यावर नियंत्रक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करुन सहा वर्षांपासून सुरू असलेल्या भारत निर्माण योजनेचे पाणी कुठे मुरत आहे, याचा शोध घेऊन संबंधित प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)