चंद्रपूर : फोटोइलेक्ट्रिक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूच्या आयनची तपासणी होऊन त्यात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियमचे प्रमाण किती आहे, याची माहिती त्वरित मिळते. यामुळे पाण्याची गुणवत्ता सटिकतेने काढता येईल. पाण्यातील दोष माहिती झाल्यास संबंधित पाणी स्रोतावर आवश्यक उपाययोजना करून दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या संभाव्य साथरोगास प्रतिबंध करता येईल. यासाठी अद्ययावत उपकरणांद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.
जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा चंद्रपूर येथे नावीन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत फ्लेमफोटोमीटर संयंत्र बसविण्यात आले असून या संयंत्राचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, चंद्रपूर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. योगेंद्रप्रसाद दुबे उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी पाण्यातील विविध मानकांचे प्रमाण, फ्लोराईडयुक्त पाण्याची तपासणी, तालुकास्तरावरील पाणी तपासणी प्रयोगशाळा, पाण्यातील अणुजैविक व रासायनिक घटक तसेच टीसीएल पावडरच्या तपासणीबाबत माहिती दिली. नवीन फ्लेम फोटोमीटर विभागीय स्तरनंतर चंद्रपूर येथे पहिल्यादांच बसविण्यात आले. जिल्ह्यात खडकांची वैविधता जास्त असल्याने नियमितपणे पाण्याची गुणवत्ता तपासणी आवश्यक असल्याचे प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी यांनी सांगितले.
बॉक्स
६०९ नमुने दूषित
जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही व वरोरा या सात ठिकाणी पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सन २०२०-२१ मध्ये मान्सूनपूर्व एकूण ९७२० पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ९१११ योग्य तर ६०९ नमुने अयोग्य असल्याचे आढळले. मान्सूनोत्तर ८४७४ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८२६५ योग्य तर २०९ नमुने अयोग्य आढळल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी यांनी सांगितले. कार्यक्रमाला कनिष्ठ भूवैज्ञानिक कुणाल इंगळे, किशोरी केळकर, पवन वनकावार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.