शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी
By Admin | Updated: November 3, 2014 23:23 IST2014-11-03T23:23:17+5:302014-11-03T23:23:17+5:30
पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी
देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशिरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धानपिकाला प्रचंड झळ बसली आहे. आता धानपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. दरम्यान, धानपीक सुकायला लागले असल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे.
यावर्षी दोन महिने उशिरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हलक्या प्रतिच्या धानाची रोवणी फार कमी प्रमाणात करण्यात आली. परंतु मध्यम व जड प्रतिच्या धानपिकांची भरपूर प्रमाणात रोवणी झाली. महागडे बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धानपिकाची रोवणी केली. अधून-मधून कमी जास्त पाऊस आल्याने धानपीक डोलू लागले. त्यानंतर मात्र पावसाने कायमची दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाच्या लोंब्या निघण्याच्या अगोदरच धानपीक सुकायला लागले. त्यामुळे धानपिकांचे रुपांतर तणसामध्ये होत असून शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
पोंभूर्णा तालुका निर्मितीला १५ वर्षांचा काळ लोटूनसुद्धा या तालुक्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ परंपरागत मामा तलाव, बोडी, नाले व विहीरीच्या पाण्यावरच अवलंबून राहून शेती उत्पादन करावे लागत आहे. यावर्षी अत्यल्प पावसाचे प्रमाण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात तलाव व बोड्या भरल्या नाहीत. त्यामुळे धानपिकाला एक ते दोनदाच पाणी मिळाले. परंतु अगदी शेवटच्या क्षणात धानपिक गर्भामध्ये असताना पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. पर्यायाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळाले.
परिणामी यावर्षी पोंभूर्णा तालुक्यातील धानपिकाच्या उत्पन्नात प्रचंड घट निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
दरवर्षी होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला असून बँकांचे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, आरोग्याचा खर्च कुठून करायचा, या विंवचनेत सापडला आहे. दरवर्षीच्या उत्पन्नात घट होत असल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे.
तालुक्यात अंधारी, वैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांवर सिंचन प्रकल्प उभारुन स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात धान उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होईल. पर्यायाने शेतकरी सुखी होईल, यादृष्टीने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना होणारी पाणी विषयक समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नदीवर सिंचन प्रकल्प उभारावे, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)