धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात
By Admin | Updated: August 19, 2014 23:37 IST2014-08-19T23:37:03+5:302014-08-19T23:37:03+5:30
सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात
रत्नाकर चटप - लखमापूर
सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसून उपलब्ध पाणी कंपन्यांच्या घशात जात आहे.
दुष्काळात वरदान ठरणाऱ्या अंमलनाला आणि पकडीगुड्डम धरणाचे पाणी फक्त कंपन्यासाठी का, असा सवाल आता निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. आॅगस्ट महिना संपत असतानादेखील पाऊस नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढील दिवसात शेती आणि पिण्याचे पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न कोरपना तालुक्यातील जनतेला पडला आहे. या तालुक्यात वर्धा नदी, अंमलनाला व पकडीगुड्डम धरण हे प्रमुख पाण्याचे स्रोत असून इतर छोटे बारमाही नाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने यामधील पाण्याची पातळी घसरली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग व नागरिकांना भोगावा लागणार आहे. त्यासाठी नदी, धरणे व बारमाही नाल्यांमधील पाण्याचा उपसा थांबविण्याची गरज आहे. परंतु तालुक्यातील सिमेंट कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.
कोरपना तालुक्यात १९८५ साली अंमलनाला व १९९१ साली पकडीगुड्डम धरणाचे बांधकाम करण्यात आले. अंमलनाला धरणाअंतर्गत खरीप हंगामात २३४६ हेक्टर तर रब्बी हंगामात १२०२ हेक्टर जमीनीला या जलाशयाचा फायदा होऊ शकतो. या धरणाअंतर्गत तालुक्यातील बैलम, हिरापूर, इसापूर, सोनापूर, गडचांदूर, धामनगाव, पिंपळगाव, नांदा,बिबी, उपरवाही, भेंडवी, मंगी, चंदनवाही, पांढरपवनी, विहीरगाव, वांगी, भुरकूंडा, पाचगाव व लाईनगुडा या २२ गावांना पाणीपुरवठा होतो. पकडीगुड्डम धरणाचे पाणी एका सिंमेट कंपनीला २५.७२ टक्के देण्याचा करार झाल्याने केवड ५७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. याऊलट सिंचन विभागाने प्रयत्न करुनही १६५ हेक्टर लाभक्षेत्रातील जमीन सिंचनापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे पिपर्डा, वनसडी, पिपरी, धानोली, लोणी, सोनुर्ली, माथा, वडगाव, इंजापूर, खिरडी, बेलगाव, धनकदेवी या गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करताच १२ गावांनी ग्रामसभेत ठराव पारित केला. त्यानंतर सुमारे ९५५ हेक्टर या करारामुळे वंचित राहिली तर प्रादेशिक नळ योजनेला ३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याच्या कराराने एकूण ११३१ हेक्टर जमीन आज सिंचनाला मुकली आहे. त्यामुळे येणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी सदर धरणाचे पाणी वाचविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्धा नदीमधूनही सिमेंट कंपन्यांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे सदर पाण्याचा उपसा थांबवून नागरिकांसाठी व शेतीला सिंचनासाठी पाणी देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तालुक्यातील ११३ गावांपैकी जवळपास २५ गावांना केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. यात अनेक घरगुती बोअरवेल, विहिरींची पाण्याची पातळी खालावत असून नळ योजनेचेही बारा वाजले आहे.