११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी
By Admin | Updated: May 17, 2015 01:28 IST2015-05-17T01:28:32+5:302015-05-17T01:28:32+5:30
शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

११५ किलोमीटर अंतरावरून येणार पाणी
वरोरा : शहराला पाणी पुरवठा करणारी वर्धा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे वरोरा शहरवासियांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील भेंडा या धरणातील पाणी वर्धा नदीमध्ये सोडल्यानंतर वरोरा शहरवासीयांना मिळणार आहे. भेंंडा धरण वरोरानजिकच्या वर्धा नदीचे पात्र ११५ किलोमिटर अंतर असून हे अंतर पार करीत वर्धा नदीपर्यंत पाणी पोहचणार आहे.
वरोरा शहराला लगतच्या तुळाना गावालगतच्या वर्धा नदीच्या पात्रातून शुद्ध पाणी मिळत असे. सध्या वर्धा नदीत पाण्याचा ठणठणाट असून पाणी पुरवठा यंत्राजवळील नदीची धार आटली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा नदीमध्ये अप्पर वर्धा, लाल पोथरा धरणाचे पाणी सोडून उन्हाळ्यात वरोरावासियांची तहान भागविली जाते. हा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसात मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी या धरणात पाणी साठा पुरेसा नसल्याने प्रशासनाने या धरणातून पाणी सोडण्यास नकार दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यामध्ये वरोरा शहरासह २५ गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरोरा शहरासह २५ गावांंना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. वर्धा नदीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा प्रवाह धरणातून सोडला जातो.
सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे आरक्षित केलेले पाणी कधीपर्यंत पोहचणार व ते नागरिकांना कधी मिळणार, हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. उन्हाळा संपायला जवळपास २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)