५० गावांमध्ये लागले वॉटर एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:36 IST2018-06-10T00:36:16+5:302018-06-10T00:36:16+5:30
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत.

५० गावांमध्ये लागले वॉटर एटीएम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आपण केलेला संकल्प पूर्णत्वास आला, याचा आनंद आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये जलशुद्धीकरण संयंत्र (वॉटर एटीएम) जनतेच्या सेवेत रूजू झाले आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्यात येतील. हा मतदार संघ अशा पध्दतीने नागरिकांना शुद्ध पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्दीकरण संयंत्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी जेव्हा आपण या परिसरात आलो असता, वेकोलिच्या कॉलनीत शुद्ध पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याचवेळी आपण प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र बसविण्याचा संकल्प केला होता. पहिल्या टप्प्यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना लोकार्पित केली. मूल आणि बल्लारपूर तालुक्यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रूपये खर्च करून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करीत आहोत. त्यानंतर मूल तालुक्यातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्याचा पहिला प्रयोग केला. तेथील सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गावातील ९५ टक्के आजार संपुष्टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्यामागील प्रमुख कारण अशुद्ध पाणी आहे. म्हणूनच या मतदार संघातील प्रत्येक गावात वॉटर एटीएम बसविण्याचा संकल्प आपण केला, असे त्यांनी सांगितले.
ही संयंत्रे देखभाल व दुरूस्तीसाठी महिला बचतगटांना दिली जाणार आहेत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड दिले जाईल. पुढील टप्प्यात बल्लारपूर तालुक्यात वेकोलिच्या माध्यमातून २९ ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्र बसविणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुगार्पूरातील वॉर्ड नं. २ आझाद चौक, वेकोलि कॉलनी, लखमापूर या ठिकाणी जलशुध्दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. अन्य ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
या गावांना मिळणार शुद्ध पाणी
वेकोलि दुगार्पूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुगार्पूर वार्ड क्र. १, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगाव, आंभोरा, वरवट, अडेगाव, चिचपल्ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगाव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुगार्पूर वॉर्ड क्र. २ येथील आझाद चौक, लखमापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्दीकरण संयंत्रे लावण्यात आली आहेत.