आज समारंभ : मोटारसायकल रॅली निघणारचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीवरून अलिकडेच केलेल्या भाष्यावरून चर्चेत आलेले राज्याचे महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांच्या जाहीर व्याख्यानासाठी चंद्रपुरात जंगी तयारी झाली आहे. शनिवारी २३ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक जनता महाविद्यालयात हे व्याख्यान होत आहे. या व्याख्यानासाठी सुरू असलेली तयारी आणि प्रचार लक्षात घेता या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जनता विद्यालयात हे व्याख्यान होत असून सुमारे पाच हजारांहून अधिक श्रोते बसू शकतील, अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. गर्दीचा हिरमोड टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी तीन मोठे स्क्रिन लावण्यात आले असून त्यावर मंचावर सुरू असलेला कार्यक्रम पहाता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाभरातून अपेक्षित असलेली गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमसंदर्भात जनजागृतीसाठी स्टिकर, पोस्टर, पत्रके, झेंडे तयार करण्यात आले असून जिल्ह्यात अनेक गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून जनजागृती सुरू आहे. या जंगी तयारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.अॅड. श्रीहरी अणे यांचे पुण्यावरून नागपूरमार्गे चंद्रपूरला आगमन होत आहे. त्यांचञया स्वागतासाठी मार्गात अनेक ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात आले असून गावकरी स्वयंस्फुर्तीने स्वागताच्या तयारीला लागले आहेत. ताडाळी, पडोली, भद्रावती, नंदोरी, वरोरा, खांबाडा, टेमुर्डा यादी ठिकाणी त्यांचे गावकऱ्यांकडून स्वागत केले जाणार आहे. चंद्रपुरात त्यांचे आगमन झाल्यावर पडोली ते जनता कॉलेज पर्यंत मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोबतच अॅड. वामनराव चटप यांच्या पुढाकारात सायंकाळी साडेचार वाजता चंद्रपुरातील गांधी चौक ते जनता कॉलेज अशी मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढाकारात आणि विदर्भ राज्य आघाडी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने हे व्याख्यान होत आहे. ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. रवी भागवत व विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज ग्राम राज्याच्या संकल्पनेवर या कार्यक्रादरम्यान भाष्य करणार आहेत. विदर्भाची सातत्याने सुरू असलेली गळचेपी आणि पचिम महाराष्ट्राच्या तुलनेत मिळणारी सापत्नभावाची वागणूक ही भावना प्रखरतेने मांडण्यासाठी हा विदर्भ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सर्व विदर्भवादी जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आपली एकजुट दाखविण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती डॉ. अशोक जीवतोडे यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाची जंगी तयारी
By admin | Updated: January 23, 2016 01:07 IST