दीड कोटींच्या औषधांसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 6, 2016 00:41 IST2016-04-06T00:41:28+5:302016-04-06T00:41:28+5:30

गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या राज्यातील युती सरकारचे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास दिरंगाई होत आहे

Waiting for one and a half months for one and a half million medicines | दीड कोटींच्या औषधांसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा

दीड कोटींच्या औषधांसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा

ओआरएस, सलाईनची अनेक रूग्णालयात कमतरत : उपचारासाठी रूग्णांची खासगी रूग्णालयात धाव
अरूण सहाय  चंद्रपूर
गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या राज्यातील युती सरकारचे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध औषधांचा तुटवडा आहे. अनेक रूग्णालयात ओआरएस, सलाईन उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण रूग्णांना उपचारासाठी खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, दीड कोटी रूपयांच्या औषधांची मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केली आहे. मात्र औषधे उपलब्ध होण्यासाठी दीड महिन्यापासून प्रतीक्षाच करावी लागत आहे.
दीड महिन्यापूर्वी दीड कोटी रूपयांचा औषधसाठा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र वित्त वर्ष संपले आणि औषध पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक रूग्णालयात औषधांअभावी रूग्णांना योग्य उपचार मिळत नाही. परिणामी ग्रामीण रूग्णांना नाईलाजास्तव उपचारासाठी खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. औषध साठ्याअभावी रूग्ण दगावला अशी एकही घटना जिल्ह्यात घडली नसली तरी रूग्णाच्या खिश्याला कात्री लागत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय अंतर्गत ३ उपजिल्हा रूग्णालय तथा १० ग्रामीण रूग्णालय जिल्ह्यात आहेत. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व रूग्णालयात औषधसाठ्याचा पुरवठा हा राज्यस्तरावरून आरोग्य विभागाच्या संचालकाद्वारे केला जाते. त्यानंतर स्थानिक रूग्णालयाच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त समितीद्वारे केले जाते. खरेदीसुद्धा याच समितीद्वारे केले जाते.

आदेश देऊन पुरवठ्याची प्रतीक्षा
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दीड कोटी रूपयांच्या औषधांचा पुरवठा करण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी दिले होते. मागणीला आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही औषधांचा पुरवठा न केल्याने अधिकाऱ्यांना व रूग्णांना औषधांसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

अनेक रूग्णालयात ‘ओआरएस’ची कमतरता आहे. औषधांचा पुरवठा न झाल्याने ही परिस्थती उद्भवली आहे. आईवीसेट, आईवी सलाईन, कफसिरफ या औषधांची कमतरता आहे.
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर.
दीड कोटी रूपयांच्या औषध पुरवठ्याचे आदेश दीड महिन्यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र अनेक औषधांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा सलाईनवर आहे.
- महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.

Web Title: Waiting for one and a half months for one and a half million medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.