अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 2, 2015 23:03 IST2015-02-02T23:03:51+5:302015-02-02T23:03:51+5:30
शासनाने वनविभागासोबतच वनविकास महामंडळाची स्थापना करून वनांचे संरक्षण आणि यातून आर्थिक नफा कमविण्याचे धोरण अवलंबिले. मात्र वनविकास महामंडळातील अनुकंपाधारकांचा

अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा
चंद्रपूर : शासनाने वनविभागासोबतच वनविकास महामंडळाची स्थापना करून वनांचे संरक्षण आणि यातून आर्थिक नफा कमविण्याचे धोरण अवलंबिले. मात्र वनविकास महामंडळातील अनुकंपाधारकांचा सामावून घेण्याच्या शासनाच्या अटी मारक ठरत आहे. १९९७ पासून २०१४ पर्यंत केवळ १८ अनुकंपाधारकांनाच वनविकास महामंडळाने सामावून घेतले आहे. तर उर्वरित उमेदवार आज-ना उद्या नोकरी मिळेल,याच आशेवर जीवन जगत आहे.
चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलातील तसेच इतर जमिनीवरील आडजातींचे झाडे तोडून त्या ठिकाणी सागवान तसेच अन्य चांगल्या दर्जांच्या झाडांचे रोपण तथा संरक्षण करून त्यातून आर्थिक नफा एफडीसीएम कमवित आहे. यासाठी या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहे. मात्र अनुकंपाधारकांना प्रत्येकवेळी डावलण्यात आले आहे. १९७४ पासून तर २०१४ पर्यंत या विभागात ७० च्या जवळपास अनुकंपाधारक आहे. मात्र यातील केवळ १८ जणाना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. १९९३ मध्ये सात, २००७ मध्ये केवळ एकाला तर २०१४ मध्ये दहा जणांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र आजही मोठ्या प्रमाणात उमेदवार प्रतिक्षेत असून अनेकांचे वयमर्यादा संपली आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांना एफडीसीएमने रोजंदारीवरही सामावून घेतले नसल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेने पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र शासनाला जाग आली नाही. (नगर प्रतिनिधी)