सोमनाथच्या पर्यटकांना ताडोबा प्रवेशद्वाराची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 26, 2016 01:05 IST2016-02-26T01:05:43+5:302016-02-26T01:05:43+5:30
दरवर्षी हजारो पर्यटक सोमनाथ पर्यटन स्थळ व सोमनाथ प्रकल्पास भेटी देतात. परंतु या पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात भ्रमंतीसाठी जाण्याकरिता अजुनही सोमनाथवरून प्रवेशद्वार नाही.

सोमनाथच्या पर्यटकांना ताडोबा प्रवेशद्वाराची प्रतीक्षा
पर्यटकांची अडचण : सोमनाथवरून प्रवेशद्वारच नाही
मारोडा : दरवर्षी हजारो पर्यटक सोमनाथ पर्यटन स्थळ व सोमनाथ प्रकल्पास भेटी देतात. परंतु या पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात भ्रमंतीसाठी जाण्याकरिता अजुनही सोमनाथवरून प्रवेशद्वार नाही. अशा हजारो देश विदेशातील पर्यटकांना येथून प्रवेश मिळावा, अशी मागणी आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या प्रकल्पाची एक बाजू मूल तालुक्याला संलग्न आहे. मूल हे नागपूर- गडचिरोली- चामोर्शी-गोंडपिपरी-चंद्रपूर मार्गाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच दक्षिण-पूर्वमध्ये रेल्वेचे मारोडा येथे रेल्वेस्थानक मिळाल्याने बल्लारशाह-गोंदिया रेल्वे प्रवासाकरिता उत्तम सोय आहे. यामुळे सोमनाथ प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लागूनच असलेले आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
अगदी काही अंतरावर समाजसेवक बाबा आमटे यांचा सोमनाथ प्रकल्प आहे. या प्रकल्पाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देण्यासाठी देशविदेशातून येत असतात. अशा पर्यटकांना सोमनाथ ते सोमनाथ प्रकल्प या दोन किमी अंतराच्या रस्त्यावर हरिण, बिबट, वाघ, मोर यांचे नेहमी दर्शन होते. या पर्यटकांना सोमनाथवरून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करण्याचा मार्गच उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)