पाहमीवासीयांनी अनुभवली स्वातंत्र्याची नवी पहाट

By Admin | Updated: August 19, 2014 23:36 IST2014-08-19T23:36:20+5:302014-08-19T23:36:20+5:30

चंद्रपूर शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर दूर असलेल्या पाहमी या गावाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यांची नवी पहाट अनुभवली. संपूर्ण आदिवासी कुटुंब असलेल्या या गावाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर

Visitors experienced new dawn of independence | पाहमीवासीयांनी अनुभवली स्वातंत्र्याची नवी पहाट

पाहमीवासीयांनी अनुभवली स्वातंत्र्याची नवी पहाट

प्रत्येक गोष्टीपासून वंचित गाव : गावाला भेट देणारे पहिले जिल्हाधिकारी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर दूर असलेल्या पाहमी या गावाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यांची नवी पहाट अनुभवली. संपूर्ण आदिवासी कुटुंब असलेल्या या गावाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन विविध ११९ दाखल्यांचे वाटप तर केलेच सोबतच जातीच्या दाखल्यासाठी लागणारे पुरावे शोधून देण्याचे आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
ताडोबाच्या बफर झोनमध्ये असलेल्या पाहमी गावाला भेट देणारे ते पहिले जिल्हाधिकारी आहेत. या अगोदर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली होती.
३५ घर व ९८ लोकसंख्या असलेल्या पाहमी गावात ७१ पुरुव व ४७ महिला आहेत. येथील नागरिकांना चंद्रपूरला यायचे झाल्यास दोन्ही बाजूने किमान १५ किमी पायी यावे लागते. कुठलेही दळणवळणाचे साधन नसलेल्या या गावाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांनी भेट देऊन येथील नागरिकांना सूवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत विविध ११९ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, या आदिवासी बांधवाजवळ जातीचे दाखले मिळविण्यासाठी वडीलोपार्जित पुरावे नाहीत. त्यांचे पुरावे उपविभागीय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांनी शासकीय अभिलेखातून शोधले असून हे पुरावे लॅमिनेशन करुन त्यांना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पाहमीच्या आदिवासी बांधवांना जातीची ओळख प्राप्त होणार आहे. हा निर्णय त्यांना सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
पाहमी येथून चंद्रपूर येण्यासाठी बोर्डा मार्गे अवघे २९ किमीचे अंतर आहे. परंतु बोर्डा येथील नदीवर पुल नसल्यामुळे ते शक्य होत नाही. हा पुल करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच गावातील नागरिक १९०९ साली बांधण्यात आलेल्या विहीरीचेच पाणी पितात. गावात पाण्याची टाकी असून पाणी नाही. ही समस्याही सोडविण्याचा शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Visitors experienced new dawn of independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.