विषाणूजन्य आजाराने जिल्ह्यात थैमान
By Admin | Updated: August 12, 2014 23:39 IST2014-08-12T23:39:46+5:302014-08-12T23:39:46+5:30
मागील काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.

विषाणूजन्य आजाराने जिल्ह्यात थैमान
नागरिक बेजार : रुग्णांच्या गर्दीने दवाखाने फुलले
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती जिल्हा आरोग्य विभाग तसेच खासगी डॉक्टरांनी केली आहे.
चंद्रपूर शहरांसह ग्रामीण भागामध्ये सध्या श्वसनाच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. ग्रामीण भागात प्रथम गावात उपचार केल्यानंतर नागरिक शहरात धाव घेत आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
यावर्षी पाऊस वेळेवर आला नाही. त्यातच पावसाळ्याच्या दिवसामध्येही उन्हाने कहर केला आहे. गर्मीने नागरिक बेजार झाले आहे. अशा स्थितीत आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
मागील महिन्यामध्ये गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली या तालुक्यामध्ये डेंग्यू आजाराने थैमान घातले होते. यात काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने शिबिर आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला. मात्र आता विषाणूजन्य आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे.
शहरातील डॉक्टरांच्या मते मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरिया मेंदूज्वर या आजाराचे रुग्ण कमी असले तरी, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात शहरातील पॅथॉलाजिस्टशी संपर्क साधला असता ग्रामीण भागात रुग्णात वाढ झाल्याचे सांगितले (नगर प्रतिनिधी)