ग्रामस्थांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:07+5:302021-01-15T04:23:07+5:30
प्रमोद येरावार कोठारी : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अग्रगण्य व तालुक्यातील महसुली मोठे गाव असलेल्या कोठारीची लोकसंख्या १३ हजारांच्या ...

ग्रामस्थांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा
प्रमोद येरावार
कोठारी : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अग्रगण्य व तालुक्यातील महसुली मोठे गाव असलेल्या कोठारीची लोकसंख्या १३ हजारांच्या घरात आहे. मात्र येथील साडेतीन कोटी रुपये खर्च करुन निर्माण झालेली पाणी पुरवठा योजना नागरिकांसाठी पांढरा हत्ती ठरली आहे.
तालुक्याच्या दर्जाचे गाव विविध समस्यांचे माहेरघर ठरत आहे. जन समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. यात लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा जनतेत सूर उमटत आहे. ही पाणी पुरवठा योजना तत्काळ चालू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येऊन तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसे पाहता कोठारीत अनेक सुविधा आहेत. गावात शाळा, विद्यालये, महाविद्यालय, बँका, दवाखाने, पोलीस स्टेशन आणि विविध सुविधा आहेत. कोठारी तसे बल्लारपूर- अहेरी मुख्य मार्गावरील मोठे गाव असल्याने साधनेही परिपूर्ण आहेत. मात्र मोठ्या विकासकामांना आता खीळ बसत आहे.
यात स्थानिक ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा तितकाच कारणीभूत आहे. यामुळेच कोठारीवासीयांची तहान भागविणारी पाणी पुरवठा योजना दिवास्वप्न ठरत आहे.
बॉक्स
उन्हाळ्यात टंचाई
पुढील महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागत असून नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित. पाण्याची ज्वलंत समस्या लक्षात घेता नळ योजनेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी आता नागरिकांची मागणी आहे.
कोट
पाणी पुरवठा योजना येत्या उन्हाळ्यापर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठपुरावा सुरू आहे. वाढीव पाईपलाईन पूर्ण करण्यात आलेली आहे. टेस्टिंग, व्हॉल्व फिटिंग झाले की पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-मोरेश्वर लोहे, सरपंच कोठारी.