गावकऱ्यांनी रोखले दिंदोडा प्रकल्पाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:29 IST2019-03-11T22:29:37+5:302019-03-11T22:29:52+5:30
पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

गावकऱ्यांनी रोखले दिंदोडा प्रकल्पाचे बांधकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील दिंदोडा गावालगत दिंदोडा सिंचन प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यात आले. जलसंपदा विभागाने एका कंपनीला प्रकल्पाचे काम दिले. प्रकल्पाचे भूमिपूजन राज्य शासनाकडून केले जाणार होते. परंतु गावकऱ्यांनी विविध मागण्या पुढे ठेवल्या. मागण्यांची पूर्तता झाल्यानंतरच काम सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून थेट बांधकामाला सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रकल्प जमीन गेलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्याशिवाय बांधकाम सुरू न करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. दरम्यान, रविवारी प्रकल्पस्थळी जावून बांधकाम बंद केले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासोबतच औद्योगिक व पिण्यांच्या पाण्यासाठी वापर होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे.
दिंडोडा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय महसूल विभागाकडून घेतला जातो. पाटबंधारे विभागाच्या कक्षेत येणारे निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतल्या जाते. प्रकल्पग्रस्तांना निश्चितपणे न्याय मिळेल.
- एस.एस. वाकोडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, वरोरा