शेतकऱ्याचा मृतदेह सोबत घेऊन गावकऱ्यांनी केले आंदोलन; नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:16 IST2025-11-07T12:15:37+5:302025-11-07T12:16:06+5:30
शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले

शेतकऱ्याचा मृतदेह सोबत घेऊन गावकऱ्यांनी केले आंदोलन; नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, शंकरपूर (चंद्रपूर): वाघाच्या हल्ल्यात शंकरपुरातील शेतकरी ईश्वर भरडे यांचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क मृतदेह सोबत घेऊन बुधवारी रात्रभर वनविभाग विरोधात आंदोलन केले. वाघाला जेरबंद करेपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही, असा इशारा देऊन ठिय्या मांडला होता. अखेर वनविभागाने लेखी आश्वासन दिल्याने गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. ग्रामस्थांनी प्रारंभी भिसी-आंबोली रस्त्यावरील असोला बसथांब्याजवळ आंदोलन सुरू केले. त्यानंतर शंकरपूर येथील भिसी कॉर्नरवर मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. वाघाला ठार करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. वनविभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सकाळी ६:३० वाजता आंदोलन मागे घेतले. यानंतर ईश्वर भरडे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
शंकरपूरमध्ये पाळला कडकडीत बंद
रास्ता रोको आंदोलन दरम्यान शंकरपूर कडकडीत बंद पाळण्यात आला. येत्या शनिवारपर्यंत वाघाला पकडले नाही. तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला. वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल. मृताच्या वारसाला नोकरी दिली जाईल. परिसराला तारेचे कुंपण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वनविभागाने दिले. आंदोलनस्थळी पोलिसांची मोठा फौजफाटा तैनात होता. स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.