बैलबंडीद्वारे गावकऱ्यांची वरोरा तहसील कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:25+5:302021-08-25T04:33:25+5:30
वनोजा मार्गे वर्धा पाॅवर कंपनी व जीएमआर कंपनीला वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एकोणा कोळसा खाणीतून कोळसा पुरविला जात आहे. ...

बैलबंडीद्वारे गावकऱ्यांची वरोरा तहसील कार्यालयावर धडक
वनोजा मार्गे वर्धा पाॅवर कंपनी व जीएमआर कंपनीला वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एकोणा कोळसा खाणीतून कोळसा पुरविला जात आहे. कोळसा वाहतूक करायची असेल, तर रस्ता तयार करण्याची जबाबदारीही कंपनी व्यवस्थापनाची आहे. मात्र गावकरी व स्थानिक प्रशासनाला न जुमानता कंपनी व्यवस्थापनाकडून निव्वळ आश्वासने देत वाहतूक सुरू आहे. जड वाहतुकीमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था बनलेली आहे. चालणेही अवघड बनले आहे. गावकरी, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी कित्येकदा तक्रार करून सुद्धा काही उपयोग झालेला नाही. अखेर गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. मंगळवारी शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी तहसीलदारांना जड वाहतुकीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, जड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्च्यात प्रामुख्याने मोहबाळा व नायदेव येथील ग्रामस्थ, मोहबाळा सरपंच नंदलाल टेमुर्डे, माजी विधानसभा अध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, ज्येष्ठ समाजसेवक रमेश राजूरकर, विशाल पारखी, वैभव डहाने, उपसरपंच शेवंताबाई मोडक, जयंत टेमुर्डे, रवी दातारकर, तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.