कधी नकोसे असलेले गाव झाले सोन्यासारखे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 12:43 IST2021-07-29T12:42:32+5:302021-07-29T12:43:15+5:30
Chandrapur News सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे.

कधी नकोसे असलेले गाव झाले सोन्यासारखे!
नीलेश झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत गावाने जिल्ह्यातून प्रथम स्थान मिळविले आहे.
गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनापूर गाव समस्यांचे माहेरघर होते. अशात ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी गावाचे रूप बदलविण्याचे ठरविले. सरपंच जया सातपुते यांच्या पुढाकारातून गावात अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. ग्रामपंचायतीने गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली. सोबतच शोषखड्डे, शौचालय बांधकाम, हातपंप खोदकाम, भाजीपाला लागवड, गावातील मुख्य भिंतींवर भिंतीचित्रे, कचऱ्याचे योग्य नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, आंतरजातीय विवाह सोहळा, मादक पदार्थाच्या विक्रीवर आळा घालणे, प्लॅस्टिक बंदी, ग्रामपंचायत पेपरलेस करणे, वृक्ष लागवड, सिंचनाच्या सोयी, नळ जोडणी, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, करमणूक केंद्र अशी अनेक विकासात्मक कामे केल्या गेली. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर फळ मिळाले. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत सोनापूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
गावाचा सर्वांगीण विकास करणे त्याचबरोबर गावाची ओळख निर्माण करणे हाच आमचा उद्देश आहे. गावकऱ्यांच्या भरीव सहकार्याने सर्वकाही साध्य झाले आहे.
-जयाताई सातपुते, सरपंच, सोनापूर.