विहीरगाव तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 29, 2014 23:45 IST2014-07-29T23:45:13+5:302014-07-29T23:45:13+5:30
सिंचनाच्या सोयीेसाठी म्हणून ब्रिटिशांनी निर्माण केलेला विहीरगाव येथील तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या शासकीय जागेवर घरे उभी राहू लागल्याने भविष्यात हा तलाव

विहीरगाव तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
मूल : सिंचनाच्या सोयीेसाठी म्हणून ब्रिटिशांनी निर्माण केलेला विहीरगाव येथील तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या शासकीय जागेवर घरे उभी राहू लागल्याने भविष्यात हा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय होण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी येथील विहिरगाव परिसरातील सर्व्हे नं. ५३ मध्ये ५२.३९ एकर जागेत तलाव निर्माण केला. १९२० नंतरच्या एकत्रिकरणाच्या काळात सदर तलावाची जागा सर्व्हे नं. ७१ करण्यात येऊन तलावाची सर्व्हे नं. २२५ दाखविण्यात येऊन सातबारामध्ये १९.२१ हे.आर. (५०.२१) असे नमूद करण्यात आलेल्या बंदोबस्त अभिलेख्यानुसार महसूल प्रशासनाने ५२.३९ एकर आकारमान असलेल्या या तलावाचे दोन भाग पडून सर्व्हे नं. ५३/१ व ५३/२ असे करताना तलावाच्या कमी करण्यात आलेल्या आराजीच्या जागेवर झुडपी जंगल अशी नोंद केली. कालांतराने शासकीय दस्ताऐवजात झुडपी जंगल असे नमूद केलेल्या जागेवर काही लोकांनी जबरानजोत शेती करणे सुरू केल्यानंतर सातबारावर तशा नोंदी करण्यात आल्या. शेतीच्या माध्यमातून सदर जागेवर जबरान शेती केल्यानंतर सातबारावर नोंदी करून घेतल्यानंतर अनेक जण सदरची जागा विकून मोकळे झाले.
जबरान करणाऱ्या मंडळीकडून सदर जागा गैरमार्गाने खरेदी केल्यानंतर अनेकांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून सादर जागेवर ले- आऊट पाडून सदर जागा स्वमालकीची समजून सर्रासपणे विकण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे वर्तमान सातबारामध्ये तलावाची एकूण आराजी ५० एकर २१ आर दाखविण्यात आली असली तरी तलावात वाढलेल्या प्रचंड अतिक्रमणामुळे तलावाची आराजी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
तलावाच्या जागेवर जबरान करून विक्री केल्यानंतर आज त्यापैकी अनेक जागेवर घरे निर्माण झाली आहे. परिणामी तलावातील पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. सदर प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीला भविष्यात सिंचनाचा फटका बसणार आहे.
शासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील शेतीसाठी सिंचन व्यवस्था होऊ शकत नसल्याने शेकडो एकर शेती पडीत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सिंचनाची सोय व्हावी,या उद्देशाने ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या तलावाची जागा प्रशासनाने दुर्लक्ष आणि संधी साधुपणामुळे काही मंडळी गिळंकृत करीत असल्याने सिंचन व्यवस्था असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो एकर शेती पडत राहण्याची शक्यता आहे.
सिंचन विभागाच्या अधिकारात असलेल्या तलावाच्या सदर जागेवर काही मंडळी ले- आऊट पाडून सर्रासपणे विकत असताना नगरपालिका प्रशासन त्या जागेवर घर बांधकामास परवानगी देत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला भविष्यात मोठा फटका बसणार आहे. तलावाच्या जागेवर अनधिकृरीत्या घरे बांधून राहत असताना पावसाळ्याच्या दिवसात सदर परिसरात आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. तेव्हा हेच प्रशासन तलावाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या मंडळींना धोका होऊ नये म्हणून सुरक्षा पुरवित असते. यावरुन शासन त्यांनाच सहकार्य करीत असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)