पाणी वाचविण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:54 IST2019-05-20T22:54:05+5:302019-05-20T22:54:25+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

पाणी वाचविण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या नद्यांवर बंधारे बांधा आणि पाणी अडवा. राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन अनेक मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहीजे व दोषींना कठोर कार्यवाही झाली पाहीजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा नत्थू गोडसे याला देशभक्त ठरविणाºया आतंकवाद्यांचा गंभीर आरोप असलेली असलेली भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञा ठाकूर हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. सिंचन विभागाने बैठक घेतली आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये आता पुढाकार घेतल्याची माहिती आहे. लवकरच निधी उपलब्ध होऊन बंधारे निर्मितीला सुरूवात होईल, असे संकेत असल्याचेही पुगलिया यांनी यावेळी सांगितले.
राजुरा येथील अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री स्वत: राजुरा येथे भेट देऊन पीडितांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री केव्हाही येऊ शकते, असेही पुगलिया म्हणाले. या आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, दवेंद्र बेले, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.