दुचाकीवरील वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; कामगारांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:48 IST2023-06-10T20:48:23+5:302023-06-10T20:48:43+5:30
Chandrapur News वेकोली दुर्गापूर कोळसा खाणीत कार्यरत असलेला कामगार काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील दर्गा व बौद्ध विहारादरम्यान घडली.

दुचाकीवरील वेकोली कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; कामगारांमध्ये दहशत
चंद्रपूर : वेकोली दुर्गापूर कोळसा खाणीत कार्यरत असलेला कामगार काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील दर्गा व बौद्ध विहारादरम्यान घडली. विकास उपरे दुर्गापूर असे जखमी कामगाराचे नाव आहे. या घटनमुळे कामगारांमध्ये दहशत पसरली आहे.
विकास उपरे हे दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीतील विद्युत व यांत्रिकी विभागात कार्यरत आहे. द्वितीय पाळीत काम आटोपून दिलीप पोडे या सहकार्यासोबत रात्री ११ वाजताच्या सुमारास वसाहतीतील आपल्या क्वाॅर्टरकडे निघाले. उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालयाच्या काही अंतर पुढे गेल्यानंतर दर्गा व बुद्ध विहारादरम्यान असलेल्या झुडपात बिबट दबा धरून बसला होता. या परिसरात गतिरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी करताच बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्यांनी दुचाकी समोर नेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेपूर्वी याच मार्गाने जाणाऱ्या दुर्गापूर रयतवारी कॉलरीमध्ये कार्यरत अंकुश डंभारे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे मात्र कामगारांमध्ये दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.