चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक आरोप करत विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा दावा केला. या वक्तव्यामुळे सभागृहात मोठी खळबळ उडाली.
वडेट्टीवार यांनी शेती क्षेत्रातील भीषण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की शेतकऱ्यांना जगण्यासाठी अवयव विकण्याची वेळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एका शेतकऱ्याचे १ लाख रुपयांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल ७४ लाखांवर पोहोचले. सावकारांच्या तगाद्यामुळे संबंधित शेतकऱ्याने कंबोडियामध्ये ८ लाखांना किडनी विकल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.
‘संघटित रॅकेट’चा संशय; MCOCA लावण्याची मागणी
वडेट्टीवार यांनी गृह विभागाच्या लेखी उत्तराचा दाखला देत १९ शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचा दावा केला. विदर्भ आणि मराठवाड्यात एजंट व डॉक्टरांच्या मदतीने संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी राज्यव्यापी चौकशीची मागणी केली.
संबंधित सावकारांवर कठोर कारवाई करून मकोका लागू करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुरेसा आर्थिक दिलासा न दिल्याबद्दल सरकारवर टीका करत सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला.
आरोपांवर उत्तर देताना राज्य सरकारने स्पष्ट केले की, किडनी विकणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या ९ आहे आणि त्यापैकी केवळ एकच जण शेतकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अवैध अवयव व्यापारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले.
यामध्ये पद्मश्री पुरस्कारप्राप्त एका डॉक्टरचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली. चंद्रपूर प्रकरणात काही आरोपी सावकारांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
Web Summary : Congress leader alleges 19 Vidarbha-Marathwada farmers sold kidneys to repay debts. An inquiry is demanded into the alleged racket. Government confirms nine cases, one farmer, and assures action against illegal organ trade, including a Padma Shri recipient doctor.
Web Summary : कांग्रेस नेता का आरोप है कि विदर्भ-मराठवाड़ा के 19 किसानों ने कर्ज चुकाने के लिए किडनी बेची। कथित रैकेट की जांच की मांग। सरकार ने नौ मामलों की पुष्टि की, जिनमें एक किसान शामिल है, और पद्म श्री प्राप्तकर्ता डॉक्टर सहित अवैध अंग व्यापार के खिलाफ कार्रवाई का आश्वासन दिया।