महापालिकेतील रिक्त पदे भरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:43+5:302021-04-20T04:29:43+5:30
बांधकाम साहित्य हटवावे चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, तुळशीनगर परिसरामध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य ...

महापालिकेतील रिक्त पदे भरावी
बांधकाम साहित्य हटवावे
चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, तुळशीनगर परिसरामध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे शहरात बेरोजगारीत वाढ झाली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा
चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅम्प परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणांवरही चालक वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़
प्रोत्साहन निधीसाठी लाभार्थ्यांची पायपीट
चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. मात्र, विभागाकडे निधी नसल्याने आजपर्यंत अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. लाभार्थी अनुदानासाठी चकरा मारत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
वाहकांकडे चिल्लरचा तुटवडा
चंद्रपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मागील काही दिवसांपासून बसफेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतली जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर त्या प्रवाशाला तिकीट लागते. प्रवाशाकडे चिल्लर पैसे असल्यास देतो. मात्र अनेक वेळा सुटे पैसे राहत नसल्याने वाहक त्या तिकिटामागे शिल्लक रक्कम लिहून देतो.
पथदिवे बंद असल्याने त्रास
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही वार्डातील पथदिवेही बंद आहे.
जागेचे पट्टे देण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश भाग हा नजूलच्या जागेवर वसला आहे. घर असूनही पट्टे नसल्यामुळे येथील नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल योजनेअंतर्गत अनेकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्याने घराचे स्वप्न लांबले आहे.
सीटीबस सुरू करावी
चंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने सीटीबस सुरू करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, दाताळा, पडोली, उर्जानगर, बंगाली कॅम्प आदी परिसरातून गांधी चौकामध्ये येणे आर्थिकदृष्ट्या सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यातच ऑटो चालकांनीही दर वाढविल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सिटीबस सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
बाबूपेठ परिसरात पाणीटंचाई
चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये नागरिकांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्या नसल्याने नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील सिस्टर काॅलनी परिसरातील टीपीएम चर्च परिसरात रस्ता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील अन्य रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मात्र एकच रस्ता सोडून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात महापालिका तसेच आमदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.
इंदिरानगरात नाल्यांची समस्या
चंद्रपूर : येथील इंदिरानगर परिरसामध्ये असलेल्या राजीव गांधी नगरमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात नाल्या तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक मदतीची मागणी
चंद्रपूर : शहरात फुटपाथ व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसाय उभा करणे कठीण जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहरातील कचरा घंटागाडीद्वारे नेला जातो. मात्र कचरा संकलकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या दिवशी सुट्टी घेतल्यास घराघरात कचरा साचतो. त्यामुळे कचरा संकलकांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
कुलर विक्रीत वाढ
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कुलर लावण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, काहींनी नवीन कुलरही खरेदी केले आहे. त्यामुळे यावर्षी कुलर विक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.