रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत खालावला
By Admin | Updated: September 18, 2014 23:33 IST2014-09-18T23:33:45+5:302014-09-18T23:33:45+5:30
पुर्वीच्या काळातील शेतकरी शेतीसोबतच गाय, म्हैस, बैल व शेळ्या आदि पाळीव जनावरेसुद्धा पाळत असत. या पाळीव जनावरांमुळे त्यांना शेतीसाठी उपयोगी असे शेणखत मिळत असे.

रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत खालावला
कोरपना : पुर्वीच्या काळातील शेतकरी शेतीसोबतच गाय, म्हैस, बैल व शेळ्या आदि पाळीव जनावरेसुद्धा पाळत असत. या पाळीव जनावरांमुळे त्यांना शेतीसाठी उपयोगी असे शेणखत मिळत असे. त्याद्वारे शेतजमिनीची पोतसुद्धा उत्तम ठेवण्यात मदत व्हायची. परंतु आधुनिक युगात अत्याधिक रासायनिक खताच्या वापराने जमिनीची पोत घसरत असल्याने दिसत आहे. असाच रासायनिक खताचा मारा सुरू राहिल्यास तालुक्यातील उपजावू असलेल्या जमिन ओसाड पडण्याची शक्यता बळावली आहेत.
शेतीत भरघोस उत्पन्न येण्याकरिता शेतकरी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतासोबतच किटकनाशकांचा अत्याधिक वापर करायला लागले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत बिघडत असल्याचे दिसू लागले आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करण्यात आला नाही, तर पिकाच्या उत्पादनात घट होत येते. परंतु असेच पुढेही चालत राहीले तर शेतजमिनीची पोत घसरून त्यामध्ये कोणत्याही पिकाचे उत्पादन होणार नाही व त्यासाठी शेतकऱ्याचे अत्याधिक रासायनिक खताचा वापर टाळणे हितावह असल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे.
शेतकऱ्यांनी पुर्वीच्या शेणखताचे महत्व ओळखून पशुपालन करण्याकडे जास्त लक्ष द्यावे, असाही सल्ला वेळोवेळी दिला जातो. शेतकऱ्यांना गाय, म्हैस व बकरी पालनाद्वारे जोडधंदा म्हणून करता येतो. परंतु अनेक शेतकऱ्याचे याकडे लक्ष नाही. मात्र अलिकडे काही शेतकरी शेणखताकडे वळल्याचे दिसून येत आहे. पिकांचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी नेहमीच शेतकरी प्रयत्नरत असतो. परंतु रासायनिक खताचा जास्त वापर जमिनीचा पोत बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरतो.
चंद्रपूर जिल्हा धानपिकांचा जिल्हा म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. या जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतल्या जाते. परंतु आस्मानी व सुलतानी संकटापुढे हवालदिल झालेला शेतकरी धान पीक सोडून इतर पिकाकडे वळू लागले आहेत. नगदी पीक घेण्यासाठी रासायनिक खताची आवश्यकता असते. तसेच पिकांवर रोगराई आल्यास किटकनाशक औषधाची फवारणीही आता आवश्यक झाली आहे. पिके चांगली बहरली पाहिजेत, यासाठी सुद्धा औषधांची फवारणी करण्यात येते. अशा अनेक प्रकारच्या रासायनिक खत व औषधांची फवारणी करण्यात येते. या रासायनिक खत व औषधांचीही शेतजमिनीला सवय झाली आहे. ती सवय मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी शेणखताकडेच वळणे आवश्यक आहे. परंतु उत्पादनाच्या नादात शेतकरी रासायनिक खते देवून शेतीची सुपीकता घटवित आहेत. पिकांवर निर्माण होणारे रोग व किडीचे प्रकार बघता शेतकरी उपाययोजना करण्याकरिता व आपले शेतपीक हाती लागावे म्हणून किटकनाशक औषधी व रासायनिक खतांचा वापर करीत असतात. परंतु जमिनीची पोत घटेल म्हणून शेतकऱ्यांची रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात करावा जेणे करून शेतजमिनीची गुणवत्ता टिकुन राहण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या परिसरात सोयाबिन व कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.(शहर प्रतिनिधी)