अज्ञात रोगाने कपाशीची पिके करपली
By Admin | Updated: September 10, 2014 23:32 IST2014-09-10T23:32:26+5:302014-09-10T23:32:26+5:30
राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील चार्ली, निर्ली, साखरी, धिडसी, कढोली, पोवनी, बाबापूर परिसरातील पिके अज्ञात रोगाने करपली असून कपाशीसोबतच तुर पिकालाही फटका बसत असल्याने शेतकरी

अज्ञात रोगाने कपाशीची पिके करपली
सास्ती : राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील चार्ली, निर्ली, साखरी, धिडसी, कढोली, पोवनी, बाबापूर परिसरातील पिके अज्ञात रोगाने करपली असून कपाशीसोबतच तुर पिकालाही फटका बसत असल्याने शेतकरी एका नव्याच संकटात सापडला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी जरा सुखावला असला तरी जास्त प्रमाणात पाऊस आल्याने परिसरातील कपाशीची पिके करपण्याच्या मार्गावर आहे. झाडाच्या बुंध्यापासून झाड करपत असून पूर्णपणे सुकत आहे. शेतातील शेकडो झाडे करपली असून शेतकऱ्यांचे चांगली हाती येणारे पीक हातून जाण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी पावसाअभावी पिकाची पेरणी केली. दुबार- तिबार पेरणी करावी लागल्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला. त्यात निसर्गाने कृपा दाखवीत अधून-मधून पाऊसही पाडला. शेतकऱ्यांनी मेहनत करुन कपाशीचे पीक चांगल्या पद्धतीने जोपासले. परंतु चांगल्या पिकावर दृष्ट लागावी तशी स्थिती झाली आहे. मात्र मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांवर रोगाची लागण होणे सुरू झाले आहे. अज्ञात रोगाने पिके करपली जात आहे. झाडाच्या बुंध्यापासून झाड करपत आहे. अनेक शेतककऱ्यांच्या शेतात अशीच परिस्थिती दिसून येत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असूनही तालुक्यात कृषी विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना कोणतहीे मार्गदर्शनही नाही. त्यामुळे शेतकरी बांधव कृषी विभागावर अत्यंत नाराजी व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)