दारू व्यवसायातून बाहेर पडलेल्या त्रिकुटाच्या जिद्दीची अनोखी कहाणी
By Admin | Updated: April 20, 2015 01:17 IST2015-04-20T01:17:47+5:302015-04-20T01:17:47+5:30
जिद्दीला प्रयत्नांची जोड दिली की, कोणतेही कार्य सिद्धीला अगदी सहज नेता येते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर हजारो युवक बेरोजगार झाले.

दारू व्यवसायातून बाहेर पडलेल्या त्रिकुटाच्या जिद्दीची अनोखी कहाणी
रूपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
जिद्दीला प्रयत्नांची जोड दिली की, कोणतेही कार्य सिद्धीला अगदी सहज नेता येते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर हजारो युवक बेरोजगार झाले. काही अजुनही रोजगाराच्या शोधात आहेत, तर काहींनी दारूबंदीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारातून स्वत:ला सावरत रोजगार उभा केला. पूर्वी देशी दारूच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या भिवापूर वॉर्डातील तीन मित्रांच्या जिद्दीची कथाही अनोखी म्हणावी लागेल. आलेल्या बेरोजगारीमुळे निराश न होता या तिघांनी संयुक्तपणे लस्सी तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
मोहम्मद जमिर शेख, नितीन धुळे, कुशाल बारशेंगे अशी या जिद्दी युवकांची नावे असून ते येथील भिवापूर वॉर्डातील रहिवासी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने बालवयातच त्यांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागली. पुढे या तिघांपैकी दोघे भिवापूर वॉर्डातील एका देशी दारूच्या दुकानात काम करू लागले, तर एकाने त्याच दारू दुकानासमोर आमलेट विक्रीचे दुकान सुरू केले. यातून ते तिघेही कुटुंबाला आर्थिक मदत करीत असत. मात्र १ एप्रिपासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन् हजारो कामगारांसोबतच या तिघांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे जगण्याची विवंचना निर्माण झाली. काय करावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. मात्र ते पराभूत झाले नाहीत. मोहम्मद जमिर शेख, नितीन धुळे या तिघांनीही एकत्र येऊन विचार केला. कुणाकडे चाकरी करण्यापेक्षा आपण स्वत:चा व्यवसाय उभारावा काय, या प्रश्नाच्या उत्तरात तिघांकडूनही होकार मिळाला. तिघांनी स्वत:च्या खिशातून भांडवल गोळा केले. त्यातून लस्सी विक्रीच्या दुकानासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आणि शहरातील शहीद हेमंत करकरे चौकात त्यांनी लस्सी विक्रीचे दुकान थाटले. यातून आता ते दररोज एक हजार रुपयांपर्यत व्यवसाय करतात. त्यातून तिघांचीही मजुरी निघते.
लस्सीसोबतच ताक, मठ्ठा, लिंबू शरबत आदींचीही विक्री केली जात असल्याने या उन्हाळी व्यवसायातून हे तिघे युवक आर्थिक सुबत्ता प्राप्त करीत आहे.