महिला तक्रार निवारण कक्षाबाबत शाळा अनभिज्ञ
By Admin | Updated: March 18, 2015 01:16 IST2015-03-18T01:16:14+5:302015-03-18T01:16:14+5:30
मकरसंक्रातीचा दिवस हा महिलांसाठी खास असतो. या खास दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ जानेवारी रोजी...

महिला तक्रार निवारण कक्षाबाबत शाळा अनभिज्ञ
घोडपेठ: मकरसंक्रातीचा दिवस हा महिलांसाठी खास असतो. या खास दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ जानेवारी रोजी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीसाठी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष तात्काळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढण्यात आला. मात्र बहुतांश शाळांना या शासन निर्णयाची कल्पनाच नसल्याचा प्रत्यय येत आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सादर केलेल्या अंतरीम अहवालांमध्ये राज्यातील प्रत्येक शाळेत महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे तसेच न्यायालयस्तरावर, ग्रामपातळीवर, शाळा, महाविद्यालयस्तरावर व औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांकरिता तक्रार निवारण समिती स्थापन करणे आदी शिफारशी केल्या आहेत.
या समितीची शिफारस विचारात घेवून शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षक संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांना सूचित करण्यात आले होते. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत. तसेच शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद माध्यमिक यांनी संबंधित जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत शाळांमध्ये पाठपुरावा करावा असे निर्देशित करण्यात आले होते.
मात्र घोडपेठ व परिसरातील बहुतांश शाळांमधील शिक्षकांना या शासन निर्णयाची कल्पनाच नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांना शासकीयस्तरावरुन लगाम लावण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला. अतिशय चांगल्या अशा या निर्णयाची काटेकोरपणे व तात्काळ अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही या निर्णयाबद्दल शाळांना कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घोडपेठ येथील जि.प. प्राथमिक शाळा, सनराईज कॉन्व्हेंट व जे.बी. प्रायमरी इंग्लीश स्कूल या शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्षाबाबत विचारणा केली असता, अशा शासन निर्णयाबद्दल माहित नसल्याचे सांगण्यात आले. सध्या शाळांचे शेवटचे सत्र सुरू आहे. बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेणे सुरू आहे.
लवकरच शाळांना सुट्ट्याही लागतील. यादरम्यान बहुतेक शिक्षक- शिक्षिका सुट्यांंमध्ये कुठे फिरायला जाता येईल का, यांच्या योजना आखण्यात व्यस्त आहेत. मात्र ज्या उद्देशाने हा महत्वपूर्ण शासननिर्णय घेण्यात आलेला आहे. तो यशस्वी करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)