अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:39+5:302021-03-17T04:28:39+5:30

चंद्रपूर : शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार असून, मनपातर्फे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी उंचावर ...

Unauthorized hoardings will be dealt with | अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार

चंद्रपूर : शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार असून, मनपातर्फे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी उंचावर असलेल्या तसेच मजबूत ढाचा नसलेल्या होर्डिंग्ज काढण्यास एजन्सीची नियुक्ती करणार असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी मनपा स्थायी समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले.

शहरात अनेक होर्डिंग्ज, बॅनर हे अनधिकृतरित्या लावण्यात आले असून, याकरिता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. अशा होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील अनधिकृत हार्डिंग्जवर गंभीरतेने चर्चा करण्यात आली. शहरात विविध जागी डिजिटल पोस्टर्स, जाहिरातींची होर्डिंग्ज, बॅनर लावलेले आहेत. यातील अनेक होर्डिंग्ज, बॅनर हे अनधिकृतरित्या लावण्यात आले असून, याकरिता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.

महानगरपालिका हद्दीत अशा स्वरूपाचे डिजिटल पोस्टर्स, जाहिरातींची होर्डिंग्ज, बॅनर उभारताना मनपाकडून परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते. मात्र, यातील अनेकांनी टॅक्ससुद्धा भरलेला नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी मनपाकडून परवानगीही घेण्यात आलेली नाही. अशा अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहेच, शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. यापूर्वी नगररचना विभागातर्फे अशा अवैध होर्डिंग्जचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पाहणी केल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही होर्डिंग्जधारकांनी दुर्लक्ष केल्याने आता मनपातर्फे कडक कारवाई केली जात आहे.

याप्रसंगी उपायुक्त अशोक गरोटे, विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, सौरभ गौतम, प्रतीक देवतळे, राहुल भोयर, सुरेश माळवे, राहुल पंचबुद्धे उपस्थित होते.

बाॅक्स

...यांच्यावर कारवाई कोण करणार?

शहरात जागा मिळेल तिथे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावरील सिग्नल, वीजखांब, पथदिव्यांचे खांब, एवढेच नाही तर विविध वृक्षांचा आधार घेऊनही मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यातील काही होर्डिंग्ज चक्क नगरसेवकांचे तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेनेसुद्धा जागा मिळेल तिथे जनजागृतीचे होर्डिंग्ज लावून स्वत:च नियम तोडला आहे. त्यामुळे कारवाई कशी आणि कोण करणार, याकडे आता सामान्य नागरिकांचे लक्ष लागले असून, प्रथम स्वत:पासून सुरुवात करावी, अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: Unauthorized hoardings will be dealt with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.