दोन हजार शाळा टीव्ही संचाविना
By Admin | Updated: September 4, 2014 23:41 IST2014-09-04T23:41:31+5:302014-09-04T23:41:31+5:30
शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये

दोन हजार शाळा टीव्ही संचाविना
पंतप्रधानांचे भाषण : रेडिओ, मोबाईलचा आधार
चंद्रपूर : शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये व्यवस्था करण्याच्या तयारीला लागला असून शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर आदेश धडकल्याने अनेक शिक्षकांनी नाकमुरडत तयारीला लागले आहेत. शिक्षण विभागातून याबाबत माहिती घेतली असता, तब्बल दोन हजार शाळांमध्ये टीव्ही संच नसल्याची माहिती आहे. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्था पूर्ण झाल्याचे सांगितले.
सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याच्या सुचना आहेत. शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीला तसे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक शाळांत टीव्ही संच नाही. ज्या शाळांत आहेत, ते टीव्ही संच धुळखात पडले आहेत. नव्या आदेशाने आता ‘त्या’ टीव्ही संचावरील धुळ साफ होणार आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांच्या शिक्षकांची पंचाईत झाली आहे. त्यांनी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची दारे ठोठावून व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एक हजार ९५५ तर माध्यमिक ५५६ शाळा आहेत. यापैकी केवळ ४७९ शाळांमध्ये टीव्हीसंच आहे. उर्वरित शाळांमध्ये टीव्ही संचाची व्यवस्था नसल्याने रेडीओ, मोबाईलच्या माध्यमातून तसेच गावात कुणाच्या घरची टीव्ही आणून किंवा ग्रामपंचायतीच्या टीव्हीवर भाषण ऐकण्याची व्यवस्था केल्याचे शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक २ हजार ५११ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक शाळांत एक लाख ६८ हजार ७९९ तर माध्यमिक शाळांत ५१ हजार ८४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे. विभाग विद्यार्थ्यांना कितपत सुविधा उपलब्ध करून देते, याकडे लक्ष आहे.(स्थानिक प्रतिनिधी)