धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित
By Admin | Updated: May 16, 2017 00:36 IST2017-05-16T00:36:13+5:302017-05-16T00:36:13+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातून सन २०१७ मध्ये धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.

धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित
अधिक उत्पन्न देणारे वाण : सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्र
बाबुराव परसावार । लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातून सन २०१७ मध्ये धानाच्या दोन नवीन जाती पूर्व प्रसारित करण्यात आलेल्या आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ९ मे २०१७ ला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रज्ञाची सभा झाली. या सभेला संशोधन संचालक डॉ. डी.एम. मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी.जी. इंगोले, अधिष्ठाता (कृषी) डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) डॉ. एम.बी. नागदेवे तसेच कृषी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ उपस्थित होते.
पूर्व विदर्भ विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टीकोनातून या विभागातील शास्त्रज्ञांनी सिंदेवाही केंद्रातून दोन धान पिकाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती पूर्व प्रसारीत केल्या आहेत. साकोली या केंद्रातून एक प्रसारीत व एक पूर्व प्रसारीत धान वाण कृषी विद्यापीठ स्तरावरून प्रसारीत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून पीडीकेव्ही-तिलक (एसवायई-५०३) हे धानाचे वाण पूर्व प्रसारीत करण्यात आले असून हे वाण १४०-१४५ दिवसात तयार होते. धानाची पोत श्रीराम या लोकल धान वाणासारखी असून श्रीराम या वाणापेक्षा २७.९१ टक्के अधिक उत्पन्न देणारी आहे.
त्याचप्रमाणे सदर वाण हे खाण्यास अतिउत्तम व कीड आणि रोगाचा काही प्रमाणात प्रतिकार करणारे आहे. ही जात ठेंगणी व न लोळणारी आहे. तसेच या केंद्रावरून पीकेव्ही एचएमटीच्या बरोबरीची पोत असलेले नवीन वाण पीडीकेव्ही अक्षद (एसवायई-७०५) हे वाणसुद्धा पूर्व प्रसारीत करण्यात आलेले आहे. सदर धान वाण १३०-१३५ दिवसांचे असून पीकेव्ही एचएमटी पेक्षा २८.१६ टक्के अधिक उत्पन्न देणारे आहे. या धानाचा उतारासुद्धा अधिक आहे. सदर दोन्ही वाणाचे कृषी विभागामार्फत स्वीकृत वाण चाचणी प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतावर खरीप हंगाम २०१७ मध्ये घेण्यात येणार आहे.
साकोली संशोधन केंद्रावरून साकोली-१० हे वाणसुद्धा पूर्व प्रसारीत करण्यात आले असून साकोली-९ हे वाण १३०-१३५ दिवसात तयार होणारे आहे. सदर धानाचा मध्यम-बारीक दाणा असून पीकेव्ही एचएमटी व आरपी ४-१४ पेक्षा अधिक उत्पन्न देणारे आहे. वरील धान वाणाच्या चारही जाती पूर्व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत शेंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली आहे.