चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागताच शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आरोग्याची खबरदारी घेत बुधवारपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शाळांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. काही पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोबाईलद्वारे समुपदेशन करून पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. मास्क लावून शाळेत आलो तरी शाळेचा पहिला दिवस आनंदात गेला, अशी प्रतिक्रिया मुला-मुलींनी व्यक्त केली.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी जि. प., नगर परिषद शाळांच्या काही मुख्याध्यापकांनी मंगळवारी प्रजासत्ताकदिनी पालकांची सभा घेतली होती. मुले शाळेत आले तर खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचीही माहिती देण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या वेळातच शाळा भरणार असल्याने जि. प. शाळांमध्ये प्रतिसाद दिसून आला. चंद्रपूर महानगर पालिकेच्या शाळांमध्येही आज मुला-मुलींचा किलबिलाट कानी आला.
सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण केल्याने विद्यार्थी आनंदाने वर्गात बसल्याचे चंद्रपूर मनपाच्या बाबूपेठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात दिसून आले. शाळेची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ वाजता असल्याने नियोजनाप्रमाणे इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या अध्यापन करून मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार सुट्टी देण्यात आली.
कोट
कोणत्याही आजारांची बाधा होऊ नये, यादृष्टीने शाळेला सॅनिटायझर करण्यात आले. वर्गखोल्यांची नीट स्वच्छता झाली. मास्क घालणे अनिवार्य केले. उपायुक्त विशाल वाघ यांनी वर्ग व्यवस्थेची पाहणी केली. पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.
-नागेश नीत, मनपा, चंद्रपूर
कोट
वर्गात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. मुलांना आरोग्याच्या सूचना दिल्या. अभ्यास मागे पडल्याने त्याबाबत माहिती देण्यात आली. मुला-मुलींची पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक मानसिकता तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
-सुनील गेडाम, जि. प. शाळा, बोर्डा
कोट
पहिला दिवस मज्जेचा
बुधवारी पाचवीचे विद्यार्थी शाळेत आल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. सर्वच विद्यार्थी मास्क वर्गात आले होते. अभ्यास केल्यानंतर शाळेच्या पटांगणात मनसोक्त खेळले. दुपारी २ वाजता सुट्टी देण्यात आली.
-तन्वी बाळू नेवारे, विद्यार्थिनी वर्ग सातवा
कोट
कोरोनाबाबत ग्रामीण भागात काही गैरसमज कायम आहेत. तरीही, शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले. पाल्य नियमित शाळेत यावे, यासाठी पालकांचेही समुपदेशन केले जात आहे.
-हरीश ससनकर, जि. प. शाळा, चिंतलधाबा