चंद्रपूर जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र १०० वरून आता ५०० हेक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:27+5:302021-01-02T04:24:27+5:30
चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पीक पद्धतीमधून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेने पीकपद्धतीत मोठे बदल घडवून ...

चंद्रपूर जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र १०० वरून आता ५०० हेक्टरवर
चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पीक पद्धतीमधून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेने पीकपद्धतीत मोठे बदल घडवून आणताना हळद पिकासाठी प्रोत्साहन दिले आहे. जिल्ह्यात १७४ शेतकऱ्यांनी १०० हेक्टरवर हळदीचे पीक घेतले. दरम्यान, उत्पादन भरघोस आले. शिवाय, उत्तम दर्जाची हळद पिकविण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले. त्यामुळे यंदा ५०० हेक्टरपर्यंत हळदीचे पीक क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.
धान उत्पादनासाठी प्रसिद्ध चंदपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कापूस, सोयाबीन तसेच इतर पारंपरिक पीक घेतल्या जाते. यातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान, पीक पद्धतीत बदल घडवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. कृषी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हळद पिकाची निवड केली. जिल्हा परिषद कृषी विभागाने वार्षिक योजना, नाविन्यपूर्ण योजनेतून बियाणांसाठी अनुदान दिले. कृषी विभागाकडून हळद बियाणांसाठी अर्ज मागविण्यात आले. वरोरा, भद्रावती, चिमूर, कोरपना व मूल येथील १७४ शेतकऱ्यांनी हळद लागवडीची तयारी दर्शविली. प्रशासनाने त्यांना आवश्यक उपकरण, बियाणे यासाठी अनुदान दिले. शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हळद पिकविल्याने हा प्रयोग यशस्वी झाला.
कमी कालावधीतील नगदी पीक
हळद पीक कमी कालावधीमध्ये हातात येणारे नगदी पीक आहे. आहार, औषधनिर्मिती, सौंदर्य प्रसाधने आणि धार्मिक विधीसाठी हळदीचा वापर होताे.
----
जंगलव्याप्त क्षेत्रात फायदेशीर
जंगलव्याप्त क्षेत्रात शेतीचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. धान, सोयाबीन, कापसाचेही हे प्राणी नुकसान करतात. दिवसरात्र मेहनत करून फुलविलेली शेती एका रात्रीतून वन्यप्राणी उद्ध्वस्त करतात. त्या तुलनेत हळदीच्या पिकाचे नुकसान कमी आहे. जंगलव्याप्त क्षेत्रासाठी हे पीक फायदेशीर ठरू शकते.
कोट
हळद पिकाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन तसेच पारंपरिक पिकांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी हळद पिकाचा पर्याय समोर आला. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावर्षी पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. पुढील काळात हळद क्षेत्र वाढविण्यासाठी भर असेल. - राहुल कर्डिले मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.