घुग्घुस: वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुसकडे येत असताना १८ चाकी ट्रक वर्धा नदी मुंगोली पुलावरून २० फूट खाली नदीत कोसळला. सदर घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घटना घडली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सुनील साखरे (३५) रा. गडचांदूर असे ट्रकचालकाचे नाव आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुस रेल्वे सायडिंगकडे येत असताना ट्रकवरून (क्र एमएच ३४ इव्ही १२४४) चालकाचे नियंत्रण सुटले आणि मुंगोली पुलावरून २० फूट खाली नदीच्या पात्रात ट्रक कोसळला. सुदैवाने चालक बचावला. मात्र ट्रकचे नुकसान झाले. सदर ट्रक सप्रा ट्रान्सपोर्टचा असल्याचा कळते. वर्धा नदीवरील या पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पुलावरून वाहने हळू चालवा असे सूचना फलक लावलेले असले तरी कमी वेळात अधिक कोळसा वाहतुकीच्या लालसेपोटी पुलावरून कोळसा वाहनांची भरघाव वाहतूक होत असल्याने मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.