आदिवासींच्या नशिबी गढूळ व दूषित पाणी

By Admin | Updated: July 6, 2017 00:40 IST2017-07-06T00:40:45+5:302017-07-06T00:40:45+5:30

देश डिजिटल होण्याकडे वाटचाल करीत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिकांना मुलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे.

Tribal people, poor and contaminated water | आदिवासींच्या नशिबी गढूळ व दूषित पाणी

आदिवासींच्या नशिबी गढूळ व दूषित पाणी

आरोग्याचे धिंडवडे : अनेक गावात पाण्याचे स्रोतच नाही
संघरक्षित तावाडे । लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : देश डिजिटल होण्याकडे वाटचाल करीत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिकांना मुलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील जिवती तालुका अतिदुर्गम असून येथील बरीच आदिवासी गावे सुविधांपासून कोसोदूर आहेत. आदिवासींना आजही गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे.
तालुका निर्मितीला दीड दशक लोटले आहे. मात्र आजही येथील काही आदिवासी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. काही गावात पाण्याचे स्रोत असले तर हे स्रोतच दूषित आहे. आणि त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागते. विहिरीत पूर्णपणे शेवाळ पसरलेले आहे. त्यात कधी ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिवती तालुका ठिकाणापासून अगदी ३ ते १२ किमी अंतरावरील गावात पिण्याचे दूषित व गढूळ पाणी लोक पित आहेत. जवळच्या भुरी येसापूर गावात शासनाचे पाण्याचे स्त्रोत नसून शेतात खोदलेल्या विहिरीतून पाणी काढून लोक पितात. शहरी भागात जे पाणी नागरिक आंघोळीसाठीसुद्धा वापरत नाहीत, असे पाणी आदिवासी बांधवांना प्यावे लागत असतानाही ही बाब प्रशासनाला आजवर गंभीर वाटली नाही. याबाबत संताप व्यक्त होत आहे.
सारंगपूर, आसापूर, धनकदेवी, भुरी येसापूर, टाटा कोहळ, अंतापूर, नोकेवाडा, लेंडीगुडा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत दूषित व गढूळ आहे. असे असले तरी प्रशासनाकडून दखल घेण्याऐवजी दुर्लक्षच होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून ब्लिचिंग पावडर टाकले जाणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. सर्व व्यवहार केवळ कागदोपत्री दाखविले जात असल्याचे दिसून येते.

आजाराला निमंत्रण
तालुक्यातील काही आदिवासी गावात पिण्याचे पाणी गढूळ व दूषित असल्याने त्याचा परिणाम येथील जनतेच्या आरोग्यावर होताना दिसतो. त्वचा रोग, खाज, उलटी, हगवण अशा प्रकारच्या विविध रोगांचा सामना येथील गावकऱ्यांना करावा लागत आहे.

फ्लोराईडयुक्त पाण्याने
दाताचे रोग
सीमेवरील काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या दातावर होत आहे. लहान मुलांपासून तर १६ वर्षे वयाच्या मुलांचे दात पिवळसर झाल्याचे दिसून येतात. अनेक वर्षापासून येथे फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने येथील मुलामध्ये दंत आजार असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे.

भुरी येसापूर व टाटा कोहळ येथील विहिरीचे पाणी अत्यंत दूषित आहे. मी भरारी (आरोग्य) पथकात असल्याने स्वत: त्या गावांना भेटी दिल्या आहेत. याच दूषित पाण्याने येथील लोकात काही आजार आहेत. यावर प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ. भुषण मोरे
वैद्यकीय अधिकारी (भरारी पथक)
प्रा.आ. केंद्र, जिवती.

Web Title: Tribal people, poor and contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.