शिवमवर वेळीच केला उपचार

By Admin | Updated: May 7, 2016 01:28 IST2016-05-07T01:28:04+5:302016-05-07T01:28:04+5:30

नोकेवाडा येथील शिवम नामक एका नऊ वर्षीय मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. जिवती येथे शिवमवर योग्य उपचार करूनच गडचांदूरला रेफर केले होते.

Treatment done at Shivam only at the time | शिवमवर वेळीच केला उपचार

शिवमवर वेळीच केला उपचार

अकारण मारहाण व रूग्णालयाची तोडफोड : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आरोप
चंद्रपूर : नोकेवाडा येथील शिवम नामक एका नऊ वर्षीय मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. जिवती येथे शिवमवर योग्य उपचार करूनच गडचांदूरला रेफर केले होते. शिवमचा मृत्यू चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात झाला असतानाही याबाबत शिवमचे वडील व अन्य काही लोकांनी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आपला रोष व्यक्त केला. रुग्णालयाची तोडफोड केली व आपल्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती जिवती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी दिली. याबाबत त्यांनी जिवती पोलिसात तक्रारही केली आहे.
नोकेवाडा येथील शिवम विष्णू खांडेकर याला ४ मे रोजी बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आणले होते. यावेळी सकाळी ९ वाजता वैद्यकीय अधिकारी कोरडे यांनी त्याची तपासणी केली. रक्त तपासले असता मलेरिया आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करून दवाखान्यात भरती राहण्यास सांगितले. मात्र शिवमच्या आईने शिवमला घरी नेले. त्यानंतर रात्री ११.१३ वाजता पंचायत समिती सदस्य महेश देवकते यांनी भ्रमणध्वनीवरून शिवम रुग्णालयात येत आहे, तुम्हीही या, असे सांगितले. आपण तात्काळ दवाखान्यात हजर झालो, अशी माहिती डॉ. कोरडे यांनी दिली.
थोड्याच वेळात शिवमला त्याच्या आई-वडीलांनी दवाखान्यात आणले. तेव्हा शिवम अत्यवस्थेत होता व त्याला झटके येत होते. त्यामुळे आपण प्राथमिक उपचार करून त्याला स्वत: आकस्मिक सेवा वाहन बोलावून गडचांदूरला रेफर केले. रात्री १२.१५ वाजता रुग्ण गडचांदूरला पोहचला. तिथेही त्याच्यावर उपचार झाले. त्यानंतर चंद्रपूरला खासगी डॉक्टरांकडे हलविण्यात आले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला.
मात्र त्यानंतर विष्णू खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवती आरोग्य केंद्रात येऊन रुग्णालयाची तोडफोड केली व आपल्याला अकारण मारहाण केल्याचे कोरडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Treatment done at Shivam only at the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.