जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर
By Admin | Updated: October 10, 2015 00:13 IST2015-10-10T00:13:24+5:302015-10-10T00:13:24+5:30
शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही.

जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर
जगण्याची विवंचना : उत्पादनापेक्षा शेतीचा खर्च झाला महाग
प्रकाश काळे गोवरी
शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही. शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. शेतीवर अतोनात खर्च करायचा. मात्र पदरात पडेल तेवढच घ्यायच. हाच वर्षानुवर्षापासूनचा नियम आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असणे गरजेचे आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी सुखी-संपन्न असणे अपेक्षित आहे. मात्र शेतीला दिवसेंदिवस अवकळा येत असल्याने शेतकऱ्यांची स्थिती खालावत चालली आहे. विदर्भाची माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणारे ठरतात. परंतु शासनाची शेतीविषयी उदासीनता व निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी पडला. तरीही कमी पावसात शेतकऱ्यांनी कशीबशी शेती फुलविली. शेतमालाच्या फळधारणेवर पाऊस असणे गरजेचे असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन दिवस आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. पावसाच्या जबरदस्त तडाख्याने कपाशी, मिरचीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले.
उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. पावसानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व मिरचीची पिके वाळली. हा पावसाचा परिणाम आहे की रोगाचा प्रादुर्भाव, हे मात्र कळायला मार्ग नाही. डवरनी, निंदन व रासायनिक खते, औषध देऊन पिके वाढविली. मात्र पावसाने पीक आडवे झाले. एवढ्या मोठ्या शेतातील भूईसपाट झालेले पीक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अंत पाहण्यासारखे होते. मजुर परवडत नसल्याने कसेबसे शेतकऱ्यांनी स्वत:च कष्ट करून पीक उभे केले. मात्र पावसामुळे झाडाजवळील माती वाहुन गेल्याने झाडाला आधार उरला नाही.
शेतकऱ्यांसारखे शेतातील पीक निराधार झाल्याने शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही. यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा घटल्याने पिकांवर केलेला खर्च निघणार नाही, अशी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कुटुंबाची चिंता त्याला दिवस-रात्र सतावत आहे. काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतीसह शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली आहे.