मध्य चांदा वन विभागात बदल्यांचे वेध
By Admin | Updated: June 2, 2014 01:02 IST2014-06-02T01:02:23+5:302014-06-02T01:02:23+5:30
मध्यचांदा वनविभागांतर्गत येणार्या गडचांदूर वनक्षेत्राधिकारीच्या जागेवर

मध्य चांदा वन विभागात बदल्यांचे वेध
कोरपना : मध्यचांदा वनविभागांतर्गत येणार्या गडचांदूर वनक्षेत्राधिकारीच्या जागेवर बदलून येण्यासाठी चक्क दोन लाखांची बोली सुरू असल्याची माहिती आहे. कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात गडचांदूर, वनसडी, पारडी आणि कोरपना ही चार वनक्षेत्रे येतात. यापैकी गडचांदूर आणि पारडी ही दोन क्षेत्रे मलाईदार असल्याचे वनकर्मचार्यांत मानले जातात. पारडी येथील क्षेत्राधिकारी सहा महिण्यांपूर्वी सेवानवृत्त झाले. त्यांच्या जागेवर अशीच बोली लागून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. या क्षेत्रात रोपवनाची भरपूर कामे असल्याने अल्पावधीत या बोली राशीची वसुली होणार होती. दरम्यान, गडचांदूर येथील क्षेत्राधिकार्याची दोन महिण्यांपूर्वी पदोन्नती झाली. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. सध्या वनसडी क्षेत्राधिकारी येथील अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. नुकतीच आचारसंहिता संपल्याने वनविभागात पुन्हा बदल्यांचे वेध लागले. त्या अनुषंगाने गडचांदूर येथील रिक्त जागेवर आपली नियुक्ती व्हावी म्हणून आठ-दहा वनक्षेत्राधिकारी प्रयत्नरत असल्याची माहिती आहे. एकाच जागेसाठी उत्सुक असलेली एवढी संख्या पाहून संबंधित वनाधिकार्यांच्याही भुवया उंचावल्या. या जागेसाठी चक्क दोन लाख रुपये मोजायची तयारी असल्याचे बोलले जाते. (तालुका प्रतिनिधी)