जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली
By Admin | Updated: September 18, 2014 23:31 IST2014-09-18T23:31:35+5:302014-09-18T23:31:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लोकंख्याही वाढली आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागात

जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लोकंख्याही वाढली आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागात सध्या अवैध प्रवासी वाहतूक कमालीची वाढली आहे. याशिवाय उद्योगांमुळे जडवाहतूक वाढली आहे. या जडवाहतुकीमुळे रस्त्यांचे बारा वाजले असून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. सिमेंट उद्योग, कोळसा खाणी, थर्मल पॉवर स्टेशन, एमईएल, आर्डीनन्स फॅक्टरी याशिवाय अनेक उद्योग जिल्ह्यात आहे. आणखी अनेक उद्योग प्रस्तावित आहेत. या उद्योगांमुळे बाहेर राज्यातील कामगार, कर्मचारी जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या वाढून २३ लाखांच्या घरात गेली आहे. यासोबतच जिल्ह्यात मोठ्या शहरांच्या सीमारेषेतही वाढ होत आहे. शहरे वाढल्याने नागरिकांना प्रत्येक गोष्टींसाठी वाहनांची गरज पडू लागली आहे. नागपूर, मुंबईसारख्या मेट्रो सीटीप्रमाणे वाहतूक साधने नसल्याने स्वत:चे वाहन घेण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. त्यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात औद्योगिक अपघातही वाढले आहेत. यामुळे रुग्णवाहिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर्षात १७ रुग्णवाहिका, ३३ मल्टी सर्व्हिसेस वेहीकल, २२६ ट्रक आणि लॉरी, १२ टँकर्स, ७८८ चारचाकी डिलेव्हरी वाहने, ९७ तीनचाकी डिलेव्हरी वाहने, ९६१ ट्रक्टर्स, २३२ ट्रेलर व इतर ६६ वाहनांचेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पंजीकरण करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या संख्ये वाहने वाढत आहेत. मात्र त्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेत पाहिजे तसा बदल अजूनही घडून आलेला नाही. अरुंद रस्ते आणखी अरुंद होत आहेत. याशिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली आहेत. ग्रामीण भागाला तालुका व जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यांचीही संख्या अधिक आहे. मात्र या रस्त्यावरून परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या फारच कमी आहे. ज्या आहेत त्यांच्या दिवसातून दोनच फेऱ्या होतात. याशिवाय अनेक गावात जलद बसथांबा नाही. त्यामुळे अवैध प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. परिणामी अवैध प्रवासी वाहतूक प्रत्येक ठिकाणी फोफावल्याचे दिसून येते. घुग्घुस, राजुरा, बल्लारपूर, वरोरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. याबाबत वारंवार ओरड करूनही जडवाहुतकीवर निर्बंध लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे रस्त्यांचे बारा वाजत आहे. या सर्व प्रकारांमुळे जिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली आहे. दररोज किरकोळ व मोठे अपघात घडतच आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)