मतमोजणी कार्यालयाजवळ होईल ट्राफिक जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:17 IST2019-05-22T23:17:26+5:302019-05-22T23:17:47+5:30
एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.

मतमोजणी कार्यालयाजवळ होईल ट्राफिक जाम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर तब्बल दीड महिना मतदारांनी निकालाची प्रतीक्षा केली. आता गुरुवारी बहुप्रतीक्षेनंतर निकाल ऐकण्याच्या उत्सुकतेपोटी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांची एमआयडीसी परिसरात चांगलीच गर्दी उसळणार आहे. परिणामी या मार्गावर गुरुवारी दिवसभर ट्राफिक जाम असणार आहे.
येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, एमआयडीसी परिसरातील या मार्गावर दररोज बऱ्याच वाहनांची आवागमन होत असते. त्यामुळे या वाहनांसाठी प्रशासनाने इतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहे.
असे राहू शकतात पर्यायी मार्ग
मतमोजणी केंद्र परिसरात गुरुवारी नागरिकांची गर्दी उसणार असल्याने रस्त्यावर ट्राफिक जाम होईल, हे निश्चित आहे. पोलीस प्रशासन यावर नियंत्रण ठेवून ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करणार.
दाताळा मार्गावर नागरिकांनी वाहने उभी ठेवली तर मोठी वाहने पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना पडोली मार्गे जावे लागेल.
पडोली मार्गे मोठ्या प्रमाणात नागरिक निकाल परिसरात आले तर दाताळा मार्गे वाहनांना मार्गक्रमण करावे लागेल.