गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम
By Admin | Updated: November 11, 2015 00:42 IST2015-11-11T00:42:01+5:302015-11-11T00:42:01+5:30
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते.

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम
गोवारी समाजाची प्रथा : चार गावांच्या सीमेवर होते आयोजन
वतण लोणेघोडपेठ
येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही गोवर्धन पूजा येथील आदिवासी गोवारी समाजातर्फे आजही तितक्याच श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते.
परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, मानोरा, मोहबाळा व इतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील ‘गो’ पाल आपल्या गायी गोवर्धन पूजेसाठी याठिकाणी घेवून येतात. अंदाजे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे, असे जाणकार सांगतात.
भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी ही गावे घोडपेठ पासून उत्तरेस चार किमी अंतरावर आहेत. या गावांमध्ये बहुतांश आदिवासी गोवारी समाजाचे लोक राहतात. गायी राखणे हा गोवारी समाजाच्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. भगवान श्रीकृष्णाला आपले आराध्य दैवत मानणारे हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गाईंची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक पुजेसाठी गायींना गोवर्धन पूजा पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासून एक मोठी भुरसी बनविण्यात येते.
गोवर्धन पुजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात.
यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून एखाद्या सुवासिनीची ओटी भरतात, त्याप्रमाणे खणा नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते. यावेळी गोवारी समाजातील लोक आपापल्या ढालीचे पूजन करतात. २० ते २५ फूट लांबीच्या काठीवर लाकडी पाटा बसवून ढाल तयार केली जाते. ही ढाल गोवारी समाजाच्या ध्वजाचे प्रतीक असते. यानंतर गोवर्धन पूजेला सुरूवात होते.
आदिवासी गोवारी समाजाच्या प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला ‘शिव बांधणे’ असे म्हणतात. त्यानंतर पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मूतीर्ची व नंतर आराध्य दैवत श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते.
पवित्र मंत्र म्हणून व नारळ फोडून भुरसीची पूजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणाऱ्या भुरसीवरून कळपाने गायींना सोडण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते. पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते. अंडे व पिल्लू यांना इजा होऊच शकत नाही असा येथील लोकांचा दावा आहे. त्यामुळे ही परंपरा येथील लोकांनी आजही कायम ठेवली आहे.