Tolerance and courtesy in Lalpari are still intact | लालपरीतील सहिष्णूता व सौजन्यशिलता अजूनही कायमच

लालपरीतील सहिष्णूता व सौजन्यशिलता अजूनही कायमच

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : बसमध्ये आताही केली जाते एकमेकांना मदत

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : सहिष्णुता हरपत चालली, अशी आपल्या देशात अधेमधे ओरड होत असते. मागील दोन वर्षात तर देशातील तथाकथित असहिष्णुतेच्या वाातावरणावर नाराज होऊन त्याचे खापर शासनावर फोडत देशातील नामवंत लेखक कवी, पत्रकार, लेखक, विचारवंत यांनी सरकारकडून त्यांना मिळालेले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावला होता. देशात अजूनही असहिष्णूतेचे वातावरण असल्याचे बरेच जण म्हणतात. असेलही! पण एक सार्वजनिक क्षेत्र असे आहे जिथे सहिष्णुता, सहकाराची भावना व सौजन्यशीलता पदोपदी जाणवते. सामान्यांना अनुभवायला मिळते. त्यामुळे मन सुखावते. ते आहे लेकूरवाळी आणि लालपरी म्हणून बहुजन सुखाय बहुजन हिताय म्हणत गाव - शहर आणि खेड्यापर्यंत नेहमी धावत राहणारी एसटी बस.
बसमध्ये एकत्र दोघेच बसतील, अशी बसण्याची व्यवस्था! पण गर्दीत दोनच्या जागी तिघेजण बसतात. एकमेकांना बसू देतात. बसायला लावतात. हे सारे होते ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून, सौजन्यातून आणि सहिष्णूतेतून. आता, त्यातही कुणी हेकड प्रवाशी, कशाला देऊ जागा म्हणत जराही सरकत नाही. पण ते अपवादानेच! एकंदरीत सारे प्रवाशी सौजन्याचे दर्शन घडवितात. एसटी बसमधून प्रवास करणारे हे मध्यमवर्गीय आणि गरीबच अधिक! गर्दीच्या वेळी त्यांच्यातील सौजन्यशीलता दोन सीटवर तिघे यातून प्रकर्षाने समोर येते. सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन असलेल्या रेल्वेच्या साधारण डब्यात ही सौजन्य - सहिष्णुतेचे असे दर्शन घडते. देशात असहिष्णुता अशी ओरड होत असताना एसटी बसच्या या अशा सहिष्णुतेचे वातावरण बघून समाधान लाभते, हे निश्चित. एसटी बसमध्ये खासदार व आमदार यांच्याकरिता राखीव जागा ठेवल्या असतात. सिटवर तसे लिहून असते. पण कोणताही आमदार वा खासदार बसने प्रवास करताना दिसत नाही. अपवाद म्हणून याबाबत काही नाव घेता येतील. माजी आमदार व खासदार स्व. राजे विश्वेश्वरराव महाराजांचा प्रवास नेहमीच बसने असायचा. बसमध्ये पत्रकार अपंग, महिला, अंध यांच्याकरिता राखीव जागा असतात. पण, आपल्या राखीव जागेवर भलतेच कुणी बसले आहे, तेव्हा त्यांना उठवावे का, असा विचारही आरक्षितांना सूचन नाही.

Web Title: Tolerance and courtesy in Lalpari are still intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.