सभापती व उपसभापती पदाची आज निवडणूक
By Admin | Updated: September 13, 2014 23:47 IST2014-09-13T23:47:03+5:302014-09-13T23:47:03+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे.

सभापती व उपसभापती पदाची आज निवडणूक
बल्लारपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी संपत असल्याने निवडणूक होऊ घातली आहे. त्यानुसार पंचायत समिती स्तरावर रविवारी १४ सप्टेंबरला सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी सभा आयोजित केली आहे. आपल्याच पक्षाला सभापती व उपसभापतीपद मिळावे म्हणून राजकीय पक्षांकडून सदस्यांची पळवापळवी झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार सभापती व उपसभापती पदासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. तद्नंतर दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार असून आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेने सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण १५ पंचायत समिती असून यातील तब्बल आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापती पदाची संधी उपलब्ध होत असल्याने महिलाराज येणार आहे. बल्लारपूर, राजुरा, गोंडपिंपरी, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, वरोरा व चिमूर पंचायत समितीचे सभापती पद महिला वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.
यामध्ये अनुसूचित जातीसाठी चिमूर, अनुसूचित जमातीसाठी गोंडपिंपरी व राजुरा, नागरिकांचा मागासप्रवर्ग वरोरा व बल्लारपूर, सर्वसाधारण महिला गटासाठी भद्रावती, सिंदेवाही व नागभीड पंचायत समिती असे महिलांना आरक्षण आहे.
ब्रह्मपुरी अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागासप्रवर्ग तर सावली कोरपना व चंद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, जिवती ४ व बल्लारपूर पंंचायत समितीमध्ये ४ असे एकूण ११४ जिल्ह्यात पंचायत समितीचे सदस्य आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपने ग्रामीण भागाच्या राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सदस्यांची पळवापळवी सुरू केली आहे. काहींना यात यश आले आहे. पंचायत समितीवर सत्ता प्राप्तीसाठी सदस्यांना प्रलोभन देण्याचा प्रकारही घडत आहे. यामुळे ग्रामीण भागाचे राजकारण ढवळून निघाले आहे. (शहर प्रतिनिधी)