नवरगावात तीन दुकाने जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:19 IST2018-06-01T22:19:41+5:302018-06-01T22:19:50+5:30
नवरगाव येथील अंतरगाव फाट्यावर असलेली दुकाने अज्ञात इसमांनी जाळल्याने एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुकानमालकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवरगावात तीन दुकाने जाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : नवरगाव येथील अंतरगाव फाट्यावर असलेली दुकाने अज्ञात इसमांनी जाळल्याने एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुकानमालकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली असून शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा छोटा उद्योग निर्माण करून नवरगाव येथील या तिन्ही तरुणांनी अंतरगाव फाट्यावर पानटपरी, हॉटेल व सलूनची दुकाने टाकून उदरनिर्वाह सुरू केला. मात्र गुरुवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने या तिन्ही दुकानांना आग लावल्याने तिन्ही दुकाने जळून खाक झाली.
यामध्ये अरुण वसंता गहाणे यांचे एक लाख, अशोक मारोती मेंढूळकर यांचे सलूनचे दुकान (३० हजार रुपये) तर जगदीश बुधा गहाणे यांचा पानठेला व हॉटेल (६० हजार रु.) असे एकूण एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुणीतरी इसम दुकानाला आग लावत असल्याचे येथील गुरख्याला दिसले.
तो त्याला पकडण्यासाठी धावला असता चारचाकी वाहनाने सदर इसम पळून गेला. घटनेची माहिती दुकान मालकांना दिली. लागलीच ते पोहचले. परंतु हॉटेलमध्ये सिलिंडर होते व आग लागली होती. त्यामुळे स्फोट होईल, अशी भीती असल्याने विझविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तिन्ही दुकाने जळाली. पोलीस विभाग व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. अज्ञात माथेफिरूने एखाद्या वैमनस्यातून हा प्रकार केला असावा, असा अंदाज आहे.