बिबट फासे प्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: January 6, 2017 01:02 IST2017-01-06T01:02:39+5:302017-01-06T01:02:39+5:30
हळदा येथील दक्षिण वनपरिक्षेत्रात रविवारला फासा टाकल्याने बिबट सापडला होता. फासे टाकणाऱ्यांचा

बिबट फासे प्रकरणी तिघांना अटक
हळदा येथील घटना : बिबट्याची करण्यात आली होती सुटका
ब्रह्मपुरी : हळदा येथील दक्षिण वनपरिक्षेत्रात रविवारला फासा टाकल्याने बिबट सापडला होता. फासे टाकणाऱ्यांचा शोध घेऊन हळदा येथील तीन जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
हळदा येथील ३०० ते ४०० मीटर अंतरावर रविवारच्या सायंकाळी बिबट फासामध्ये अडकला होता. त्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले होते. दुचाकीच्या क्लच वायरचा फास असल्याने बिबट चांगलाच अडचणीत सापडला होता. बिबट्याला बेशुद्ध करुन फासातून सुटका करण्यात आली होती. परंतु हा फास कोणी लावला होता, याचा शोध वनविभाग घेत असताना बुधवारला हळदा येथील देविदास कामडी (४०) , दिवाकर गेडाम (३२), किशोर कामडी (२६) यांचे नाव समोर आले. त्यांच्यावर वन कायदा १९७३ वन्यजीव संरक्षण अभिनियम कलम ९, ३४, ५०, ५१ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नाथगमकर, आवळावचे क्षेत्र सहाय्यक बी. डी. राऊत यांनी ही कारवाई केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. या कारवाईने फास मांडून शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पिकाचे अतोनात नुकसान
शेतकऱ्यांच्या पिकांचे प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत आहे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे वनकायदा तर दुसरीकडे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतीत आहे. यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी आवळगाव, वांद्रा, मुंडसा, भुज, एकारा, मेंडकी आदी भागातून केली जात आहे.