राजगड येथे आढळले डेंग्यूचे तीन रुग्ण
By Admin | Updated: August 30, 2014 23:33 IST2014-08-30T23:33:38+5:302014-08-30T23:33:38+5:30
तालुक्यातील राजगड येथे डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाच्या वतीने गावात कॅम्प लावून डेंग्युसदृष्य तापाची साथ नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राजगड येथे आढळले डेंग्यूचे तीन रुग्ण
मूल : तालुक्यातील राजगड येथे डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाच्या वतीने गावात कॅम्प लावून डेंग्युसदृष्य तापाची साथ नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजगड मध्ये डेंग्युचे रुग्ण आढळल्याने परिसरातील गावात याबाबत प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे.
राज्यात ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या राजगड गावात नियमित ग्रामस्वच्छता केली जाते. गावातील स्वच्छतेबाबत सर्व जनता जागृत असताना मात्र, डेंग्युचे रुग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात डेंग्युची साथ पसरल्याने विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक स्वास्थ केंद्र मारोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी राजगड गावात डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याचे सांगितले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. मात्र पुढे रुग्णांची पुन्हा संख्या वाढू नये, यासाठी स्वच्छता, फवारणी करुन ताप नियंत्रणाखाली आण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य विभागाने कॅम्प लावला असून वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका वेळोवेळी लक्ष ठेऊन असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)