न्याय्य मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी
By Admin | Updated: July 5, 2014 01:20 IST2014-07-05T01:20:42+5:302014-07-05T01:20:42+5:30
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे.

न्याय्य मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी
चंद्रपूर: उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा फाडणारी एक घटना पुढे आली आहे. बल्लारपूर येथील रितेश शुक्ला या युवकाने अनुभवलेली ही कहानी त्यानेच येथे पत्रकारांना ऐकविली.
बल्लारपूर येथील सुभाष वॉर्डातील रहिवासी रितेश शुक्ला व त्याचा भाऊ रुपेश यांचा विवाह फत्तेपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील कुटीया येथील विद्याप्रसाद तिवारी यांच्या दोन मुली गुंजन व कोमल यांच्याशी झाला होता. लग्नानंतर या दोन्ही बहिणी आपल्या माहेरी येत जात असत.
जानेवारी महिन्यात रितेशचे सासरे विद्याप्रसाद तिवारी हे बल्लारपूर येथे आले व त्यांनी दोन्ही मुली व दोन महिने वयाच्या नातीला २० दिवसांसाठी गावी नेतो, असे सांगून घेऊन गेले. मात्र त्यानंतर अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी मुलींना बल्लारपूर येथे पाठविले नाही. त्यामुळे रितेश स्वत: कुटीया येथे गेला. दरम्यान, जिवे मारण्याच्या उद्देशाने रितेशची पत्नी, सासू व पत्नीच्या भावाने संगनमत करून जेवणात विष कालविले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी रितेशच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख ११ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर घराला कुलूप लाऊन सर्वजण तेथून निघून गेले.
रितेशची प्रकृती बिघडल्याने सासरच्या शेजारी राहणाऱ्या विवेक वाजपेयी व त्याच्या एका मित्राने रितेशला तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती ठिक झाल्यानंतर रितेने जवळच असलेल्या मलवा येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अलाहाबाद पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार केली. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर फत्तेपूर न्यायालयात प्रकरण दाखल केले. मात्र तेथे वकिलांचा संप सुरू असल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला. उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन रितेश संबंधित पोलीस ठाण्यात पोहचला. मात्र तरीही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तक्रार स्विकारण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी केली. ंअन्यथा विविध गुन्हे दाखल करण्याची धमकीही पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)